प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना, उदय सामंत रत्नागिरीत देणार तिरंग्याला सलामी, शिंदे गटामध्ये अस्वस्थता
| रायगड | खास प्रतिनिधी |
भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यामध्ये 26 जानेवारी रोजी मुख्य ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत हे ध्वजारोहण करणार नाहीत. त्याऐवजी मंत्री आदिती तटकरे यांची वर्णी लागली आहे. विकास निधी मिळवण्यात तटकरे आणि कंपनी शिंदे गटावर आधीच भारी पडली आहे. असे असताना आता सरकारी मुख्य ध्वजारोहणाचा मानदेखील आदिती तटकरे यांनी आपल्याच पदरात पाडून घेतला आहे. त्यामुळे शिंदे गटाला पुन्हा एकदा चपराक बसल्याचे बोलले जाते.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेत बंड करुन सत्तांतर घडवून आणले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर व्हावे लागले होते. भाजपाशी हातमिळवणी करत शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले. यामध्ये महाडचे आमदार भरत गोगावले हे शिंदे यांच्यासोबत आघाडीवर होते. त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती, मात्र त्यांच्याच पक्षातील आमदार नाराज झाल्याने त्यांना मंत्रीपदाचा लाभ झाला नाही. याबाबतची खंत आमदार गोगावले यांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.
अजित पवार यांच्यासोबत येत आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर तेदेखील सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमारे 11 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे गटाच्या कोट्यातील मंत्रीपदं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाली. या ठिकाणीदेखील शिंदे गटाच्या आमदारांना हात चोळत बसावे लागले, तर आमदार गोगावले यांना पुन्हा मंत्रीपदाने हुलकावणी दिली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिंदे गटाने भाजपासोबत हातमिळवणी केली होती. जिल्ह्यात तटकरे कंपनीच्या विरोधात त्यावेळी रान पेटवण्यात आमदार गोगावले आघाडीवर होते. मात्र, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
मंत्रीपद आणि नंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल अशी भाबडी आशा आमदार गोगावले यांना आजही आहे. मात्र, त्यांचे स्वप्न साकार होताना दिसत नाही. पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्याचा निर्णय आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असले, तरी त्यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असल्याने ते रत्नागिरीत ध्वजारोहण करणार आहेत. रायगड जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहणाचा मान आता आदिती तटकरे यांना मिळाला आहे. त्यामुळे आमदार गोगावले यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचे बोलले जाते. तटकरे आणि कंपनी पुन्हा एकदा शिंदे गटावर भारी पडल्याचे दिसून येते.