राष्ट्रवादीच्या सरचिटणीसांना सहा महिन्यांची शिक्षा

| पेण | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सरचिटणीस गंगाधर धर्माजी पाटील, रा.बोर्झे, ता. पेण यांना सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायाधीश पेण यांनी सुनावली आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की, गंगाधर पाटील यांना चेक बाऊन्सप्रकरणी दोषी ठरविण्यात आले.

आरोपी गंगाधर धर्माजी पाटील यांनी धनादेश क्रमांक 011595, जनता सहकारी बँक, पेण शाखा धनादेशाची रक्कम रुपये 3 लाख 30 हजार रुपये हा अनादरीत झाल्याकरिता (चेक बाऊन्स) रक्कम रुपये 4 लाख 45 हजार रुपये एवढा दंड म्हणून भरण्याची व सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीने दंडाची रक्कम भरण्यास कसूर केल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षादेखील सुनावण्यात आली आहे. आरोपीने भरलेल्या दंडाच्या रकमेपैकी रक्कम रुपये 4 लाख 20 हजार फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून अपिलीय कालावधीनंतर देण्यात यावे. उर्वरित रक्कम सरकारजमा करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्याबाबतची तसेच इतर कोणत्याही गुन्ह्यामध्ये आरोपीस शिक्षा झाल्यास या गुन्ह्यातील शिक्षा मूळ शिक्षेच्या क्रमवर्ती पद्धतीने भोगावयाची आहे. तसेच आरोपीच्या वैयक्तिक जामीनकदबे व बंधपत्र रद्द करण्यात येत आहेत, असा निकाल न्या. प्रितेश देशपांडे यांनी (दि.12) मार्च रोजी आरोपी गंगाधर पाटील यांच्याविरुध्द दिला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, गंगाधर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘अजित पवार गट’ जिल्हा सरचिटणीस असून, खासदार सुनील तटकरे यांचे खंदेसमर्थक आहेत. त्यामुळे धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात दोषी ठरवून शिक्षेस पात्र झाल्याने ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस पेणसह रायगडमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Exit mobile version