। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीय. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर अधिवेशनच्या पूर्वसंध्येलाच आरोप प्रत्यारोप केले होते. आज पहिल्याच दिवशी या संघर्षाची झलक पुन्हा एकदा पहायला मिळाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी गदारोळ केल्यानंतर सभागृहाच्याबाहेर विधानभवनाच्या आवारामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्यापालांविरोधात घोषणाबाजी केली. राज्यपालांचा विरोध करण्यासाठी एका शिवसेना आमदाराने चक्क शीर्षासनही केलं.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांमुळे नाही तर सत्ताधार्यांमुळेच सभागृहात गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तुफान घोषणाबाजी केली. यामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांमध्ये आटोपतं घ्यावं लागलं. त्यामुळे विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे. मात्र या प्रकारानंतर शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या आवारात राज्यापालांविरोधात घोषणाबाजी केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या त्या विधानाचा निषेध करण्यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यानंतर सभागृहाबाहेर येऊन शिवसेना आमदार घोषणाबाजी करु लागले. ‘राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव’च्या घोषणा शिवसेना आमदारांनी दिल्या. तसेच ‘राज्यपाल राज्यपाल खाली डोकं वर पाय,’ अशा घोषणाही यावेळी शिवसेना आमदारांनी दिल्या.
शिवसेना आमदारांकडून ‘राज्यपाल राज्यपाल खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा दिल्या जात असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणार्या राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी शीर्षासन करुन राज्यपालांचा निषेध केला. खाली डोकं वर पाय या घोषणेला अनुसरुन दौंड यांनी शीर्षासन केली.