। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाने अनेक नेते घडविले आणि त्या नेत्यांनी इतिहास घडविला. चरीचा संप असो किंवा कामगारांवरील अन्याय.. शेकापने केवळ समाज परिवर्तनासाठी राजकारण केले. राजकारणात अर्थकारणाचा विचार न करता केवळ समाजकारणाला महत्व दिले. ज्याचा उल्लेख आजही जुने नेते आवर्जून करतात. शेकापच्या नेत्यांची पक्षाप्रती असलेल्या निष्ठेचा उल्लेख राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीदेखील अलिकडेच केला. शेकापच्या एकनिष्ठ नेत्यांचे कौतुक करीत त्यांनी प्रा. एन.डी.पाटील, स्व.गणपतराव देशमुख, आ. जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, माजी आ. पंडीत पाटील यांच्या कार्याला सलाम केला.
राजकिय कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना त्यांनी म्हटले की, शेकाप म्हटले कि, भाई जयंत पाटील तसेच एन.डी. पाटील यांच्या घराची आठवण होते. सध्याचे राजकारण बघितले तर आठ-दहा वर्षात चार पक्ष फिरुन आलेला नेता दिसतो. मात्र प्रा. एन.डी.पाटील, स्व. गणपतराव देशमुख, आ. जयंत पाटील यांच्यासारखी सर्व जुनी नेतेमंडळी आयुष्यभर शेकापत राहीली. त्यांनी पक्ष बदलण्याचा विचारही कधी केला नाही. आजचा आमदार असेल तरी सकाळी उठून विचारावं लागतं की, आज कोणत्या पक्षात आहे? अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात असताना शेकापच्या सर्व निष्ठावंत सैनिकांना, नेत्यांना सलाम. सत्ता नसतानाही पक्ष, मतदार आणि त्यांच्या तत्त्वांप्रती असलेल्या अखंड निष्ठेचे मनाःपासून कौतुक, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी शेकापच्या नेत्यांचे केलेले कौतुक सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असून सर्वपक्षीय नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी शेकापच्या नेत्यांची पक्षाप्रती असेलेली निष्ठा आत्मसात करावी, असे आवाहनही अनेकांनी केले आहे.