नवनाथ, रामसेवक, बाल उत्कर्ष उपांत्यपूर्व फेरीत
| मुंबई | प्रतिनिधी |
रामसेवक, बालउत्कर्ष संघाने अभिनच स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या तृतीय श्रेणी (स्थानिक) पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.नवनाथ मंडळाला मात्र उपांत्यपूर्व फेरी गाठण्याकरिता 5-5 चढायांचा डाव खेळावा लागला. माटुंगा(पूर्व) येथील नप्पू लखमशी मनोरंजन मैदानावर अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात नवनाथ मंडळाने पूर्वार्धातील 12-17 अशा पिछाडीवरून ज्ञानेश्वर मंडळाला पूर्ण डावात 35-35 असे बरोबरीत रोखले. त्यानंतर झालेल्या 5-5 चढायात 6-5(41-40) असे चकवीत बाजी मारली. अंकित घाडी, सिद्धेश गुरव यांच्या झंजावाती खेळाने नवनाथ मंडळाने ही किमया साधली. ज्ञानेश्वरच्या दिलीप जयकर, जितेश कट्टे यांनी अखेच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली.
रामसेवकने श्री साईराजला 41-31 असे पराभूत करीत आपली आगेकूच सुरूच ठेवली. पहिल्या डावात 21-11 अशी आघाडी घेणार्या रामसेवकला दुसर्या डावात साईराजने जशाच तसे उत्तर दिले. पण विजय मात्र त्यांच्यापासून दूरच राहिला. शेवटी पहिल्या डावातील आघाडीवर रामसेवकने बाजी मारली. संकेत पोतदार, साहिल दळवी यांनी रामसेवककडून, तर प्रसाद चौधरी, तेजस चाळके यांनी साईराजकडून उत्कृष्ट खेळ केला. बाल उत्कर्षने चुरशीच्या लढतीत महेश मंडळाला 24-20 असे नमवित पुढची फेरीत प्रवेश केला.
मध्यांतराला 11-12 अशा पिछाडीवर पडलेल्या बाल उत्कर्षने दुसर्या सत्रात ही किमया साधली. श्रीकांत रेड्डी, मोहन सावंत यांच्या चढाई-पकडीच्या खेळाने हा विजय साकारला. विकि सिंह, जयेश खांबे यांचा खेळ महेश मंडळाचा पराभव टाळण्यास कमी पडला.कुमार गटात उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या संघाचा निकाल संक्षिप्त :- 1)एस.एस.जी.फौंडेशन वि वि गोलफादेवी (47-28), 2)अशोक मंडळ वि वि हिंद केसरी(43-30), 3)सूर्यकांत व्या. मंडळ वि वि शिवप्रेरणा (38-36), 4)अमर संदेश वि वि शिवमुद्रा (34-24)