अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता
। नेरळ । प्रतिनिधी ।
महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सिडको महामंडळ आपल्याकडे घेण्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मात्र,ऐनवेळी दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ या म्हणीप्रमाणे हे महामंडळ काँग्रेसकडेही जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. या महामंडळावर अध्यक्ष म्हणून वर्णी लागावी यासाठी शिवसेनेचे आ. भरत गोगावले, राष्ट्रवादीचे माजी आ.सुरेश लाड,उरण चे स्थानिक नेते प्रशांत पाटील प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते.सिडको महामंडळ हे आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याने ते आपल्याकडेच रहावे यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील आहे.तर काँग्रेसनेही यासाठी आग्रह धरलेला आहे. भरत गोगावले यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे गोगावले समर्थक यांच्याकडून सांगण्यात येत होते.तशी जाहिरात देखील गोगावले यांच्याकडून त्यावेळी केली गेली होती,मात्र आजतागात सिडको माहामंडळावर अध्यक्ष नेमले गेले नाहीत. राष्ट्रवादीकडून सुरेश लाड यांनाही राजकीय अस्तित्वासाठी सिडकोचे अध्यक्षपद खुणावतेय. यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नाराजीही व्यक्त केलेली आहे. त्यामुळे लाड यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना सिडको महामंडळ दिले जाईल असे बोलले जात होते.मात्र अडीच वर्षाचा कालावधी लोटला तरी सिडको काही कोणाला मिळाले नाही.उरणच्या प्रशांत पाटील यांनीही सिडको अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी केलेली आहे.पण अद्याप त्यावर राजदरबारी निर्णयच झालेला नाही. तिन्ही पक्षांसाठी सिडको महत्वाचे असून या भागात पुन्हा उभारी घेण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस प्रयत्न करीत आहे.अशावेळी आघाडी सरकारच्या धोरणानुसार सिडको चे वाटप झाले तर काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या गळ्यात सिडको अध्यक्ष पदाची माळ पडू शकते.