रायगडातील बंडखोरांच्या जखमांवर चोळले मिठ
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावरील रोषामुळे तीनही आमदार बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. पालकमंत्र्यांना विरोध करणार्या बंडखोर आमदारांना जरासुद्धा किंमत न देता मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर मंत्र्यांकडील खात्यांचा अधिभार इतर मंत्र्यांकडे सोपविताना राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडे नव्याने पाच राज्यमंत्री पदे देण्यात आली आहेत. त्यामुळे आधीच्या सात राज्यमंत्रीपदांसह नव्या पाच खात्यांसह अदिती तटकरे यांच्याकडे तब्बल एक डझनभर खाती झाली आहेत. जिल्ह्यातील बंडखोर आमदारांना अजिबात किंमत न देता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा अदिती तटकरे यांनाच झुकते माप देत एकप्रकारे बंडखोरांच्या जखमेवर मिठच चोळले असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे.
राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील सांस्कृतिक कार्य, अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील शालेय शिक्षण असे पाच राज्यमंत्रीपद सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे आता अदिती तटकरे यांच्याकडे पुर्वीच्या , उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय या सात खात्यांचे राज्यमंत्री पद आहे. त्यात नव्याने पाच खात्यांचे राज्यमंत्रीपदी सोपविण्यात आल्याने अदिती तटकरे यांच्याकडे आता 12 म्हणजेच डझनभर राज्यमंत्री पदे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे अदिती तटकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होणार्या रायगड जिल्ह्यातील बंडखोर आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांच्या जखमेंवर एकप्रकारे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांजी मिठच चोळले असल्याचे बोलले जात आहे.