राष्ट्रवादीचे अलिबाग तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे यांचा शेकापक्षात प्रवेश

| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता ढवळे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षप्रवेश करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा आयोजित केला जाणार आहे.
तालुक्यात वेश्‍वी,नवेदर नवगाव,कोप्रोली या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच दत्ता ढवळे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत विकासाची कास धरणार्‍या शेकापसमवेत काम करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.

गेली दोन दशके ते पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीत कार्यरत होते. या काळात त्यांनी चेंढरे ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदीही भूषविले होते.शिवाय गेली अडीच वर्षे ते तालुकाध्यक्ष म्हणूनही काम करीत होते.याशिवाय अलिबाग तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.जिल्हा शांतता कमिटीचे सदस्यही म्हणूनही ते काम करीत आहेत.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना तालुक्यातील पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याने आपण शेतकरी कामगार पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.शिवाय आपण यापूर्वीच तालुकाध्यक्षपदाबरोबरच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे.

दत्ता ढवळे,माजी उपसरपंच,चेंढरे
Exit mobile version