महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या स्वागताची लगबग सुरू असतानाच महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा फटका पिंपळभाट ग्रामस्थांना बसला. ऐन सणासुदीत संपूर्ण गाव तब्बल 12 तास अंधारात राहिले. गणपतीच्या सजावटीसह घरगुती कामांसाठी वीज आवश्यक असताना पुरवठा खंडित होऊनही तो तातडीने पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. चेंढरेचे माजी सरपंच दत्ता ढवळे यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर अखेर बारा तासांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
गणरायाचे आगमन सोमवारी (दि.14) घरोघरी होणार आहे. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी सजावट आणि विद्युत रोषणाईची तयारी जोरात सुरू आहे. अनेक भक्त रात्री उशिरापर्यंत जागून सजावटीची कामे करीत आहेत. अशातच अलिबाग तालुक्यातील पिंपळभाट गावातील वीजपुरवठा अचानक खंडित झाला.
वीजपुरवठा बंद झाल्यानंतर चेंढरेचे माजी सरपंच दत्ता ढवळे यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता कुसुमानंद दळवी यांच्याशी संपर्क साधला. मात्र, वीजपुरवठा पूर्ववत करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप ढवळे यांनी केला आहे. त्यामुळे पिंपळभाट गाव तब्बल 12 तास अंधारात राहिले.
खंडित वीजपुरवठ्याबाबत दत्ता ढवळे, संदीप ढवळे, सुरेश घरत यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने अखेर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊनही संबंधित अधिकारी जबाबदारीने काम करीत नसल्याचा आरोप दत्ता ढवळे यांनी केला आहे. सहाय्यक अभियंता दळवी हे कार्यालयात दारूच्या नशेत काम करीत असल्याची शंका निर्माण झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याने सहाय्यक अभियंता दळवी यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.






