महामार्गावर तासन्तास वाहतूक ठप्प
| माणगाव | सलीम शेख |
गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर करण्यासाठी माणगाव-इंदापूर बायपासची एक लेन सुरू करण्याचे आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे दावे अखेर हवेतच विरले आहेत. बायपासचे काम रखडलेलेच राहिल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांचा महापूर आला असून, माणगाव-इंदापूर मार्गावर तासन्तास वाहतूक ठप्प होत आहे. पाहण्या, बैठका आणि आश्वासनांची रेलचेल झाली; मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असल्याने ‘आश्वासनांची लेन’ सुरू झाली; पण बायपासची लेन नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माणगाव बाजारपेठ आणि इंदापूर परिसरातील अरुंद रस्ता, महामार्गाची मर्यादित क्षमता आणि रखडलेले बायपासचे काम यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
गणेशोत्सवापूर्वी बायपासची किमान एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाईल, असे मंत्री, खासदार, आमदार आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडून वारंवार सांगण्यात आले होते. कामाची पाहणी, बैठका आणि ठेकेदाराला सूचना यानंतरही प्रत्यक्षात मात्र एकही लेन सुरू झाली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने फोल ठरल्याचे चित्र आहे.
स्थानिक माध्यमांनी यापूर्वीच बायपासच्या कामाची गती, मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री पाहता गणेशोत्सवापूर्वी लेन सुरू होणे कठीण असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. अखेर गणेशोत्सवाच्या उंबरठ्यावर निर्माण झालेली वाहतूक कोंडी या वस्तुस्थितीवर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.
पाहण्या झाल्या, मग काम कुठे?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी बायपासची पाहणी केली. ठेकेदाराकडून कामाचा आढावा घेण्यात आला आणि कामाला वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र या सर्व प्रक्रियेनंतरही वाहतुकीला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे पाहणी, बैठक आणि आश्वासनांपलीकडे प्रत्यक्ष काम किती पुढे गेले, याचा हिशेब जनतेसमोर ठेवण्याची वेळ आली आहे.
जर गणेशोत्सवापूर्वी एक लेन सुरू करणे शक्य नव्हते, तर त्याची वस्तुस्थिती वेळेत का सांगण्यात आली नाही? कामाची वास्तविक प्रगती लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला माहीत होती का? आणि माहीत असूनही आश्वासने दिली असतील, तर त्याची जबाबदारी कोणाची? हे प्रश्न आता कोंडीत अडकलेल्या प्रवाशांकडूनच विचारले जात आहेत.
दरवर्षी गणेशोत्सवात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढते, हे प्रशासनाला आणि महामार्ग यंत्रणेला माहीत असतानाही पर्यायी वाहतूक नियोजन का झाले नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. एकेरी मार्ग, डायव्हर्शन, पार्किंग, अतिरिक्त मनुष्यबळ आणि वाहतूक नियोजन याबाबत आधीच ठोस उपाययोजना करणे अपेक्षित होते. पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरले असले तरी पोलीस वाहतूक नियंत्रित करू शकतात; रखडलेला बायपास पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर अतिरिक्त ताण देण्यापेक्षा माणगाव-इंदापूर बायपासचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची गरज आहे.
माणगाव ठरला पुन्हा एकदा ‘वाहतूक कोंडीचा स्पॉट’
गणेशोत्सवासाठी आनंदाने गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांना माणगावमध्येच तासन्तास कोंडीत अडकावे लागत आहे. वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे माणगाव पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावरील ‘वाहतूक कोंडीचा स्पॉट’ ठरला असून, लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांची पोलखोल या कोंडीनेच केली आहे.





