राज्यपालांविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचा ठिय्या

। पुणे । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेेले वक्तव्य सध्या वादग्रस्त ठरलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत असून पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात येत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. ’समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारले असते का?’ असे वक्तव्य राज्यपालांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये केले आहे.
राज्यपालांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख नेत्यांनी या विरोधात रोष व्यक्त करत माफीची मागणी केली आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्याचा निषेध करत शरद पवारांनी मागे केलेले एक वक्तव्य त्याबाबतचा खुलासा म्हणून ट्विट केलंय. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनीही राज्यपालांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे. रोहित पवार यांनी म्हटलंय की, खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्यपाल माफी मागा, असं त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करत पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देखील येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्यांना झालेला धक्काबुक्की आणि त्यानंतर करण्यात आलेला सत्कार यामुळे पुणे महापालिका चर्चेत होती. त्यानंतर आता पुन्हा प्रवेश दारातच हे आंदोलन करण्यात येत आहे.

Exit mobile version