एनडीआरएफची आपत्तीप्रवण गावांना भेटी

नैसर्गिक आपत्तीप्रसंगी बचावासाठी जनजागृती

| रायगड | खास प्रतिनिधी |

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एनडीआरएफ) दरडप्रवण गावांना भेटी देण्यात आल्या. ग्रामस्थांमध्ये पाऊस आणि अतिवृष्टीच्या कालावधीत सतर्क राहण्याबाबत त्यांच्याकडून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महाड व परिसरामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती, यापूर्वी आलेल्या महापुराच्या पार्श्‍वभूमीवर दरड, अतिवृष्टी व पूरस्थितीप्रसंगी बचावासाठी जनजागृती आणि प्रात्यक्षिकाद्वारे पूर्वतयारी केली जात आहे.

महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांमधून एनडीआरएफच्या पथकाने आपल्या भेटी सुरू केल्या असून, शहराजवळ असलेल्या चांभारखिंड व विविध गावात एनडीआरएफच्या पथकाने भेट दिली. दरडग्रस्त गावात भेट देऊन गावातील नागरिक व शासकीय कर्मचारी यांच्याबरोबर संभाव्य असणार्‍या धोक्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. यातील काही जवानांनी मागील वर्षे महाडमध्ये मदत कार्यात काम केले आहे. या एनडीआरएफच्या पथकामध्ये कमांडंट निरीक्षक दिलीप कुमारसह 31 जवान असून, 28 पुरुष व दोन महिला जवानांचा समावेश आहे.

सावित्री नदीपात्रामध्ये बोट चालविण्याचे प्रात्यक्षिक
संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीने महाड तालुक्यामध्ये दादली पूलनजीक सावित्री नदीपात्रामध्ये बोट चालविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. महाड उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद, महसूल, पोलीस तसेच इतर संबंधित विभाग यांच्यासह आपदामित्र यांनी यशस्वीरीत्या प्रात्यक्षिक आयोजित केले.
Exit mobile version