गरज तरंगत्या जेट्टीची अन्‌ उभारली जंगल जेट्टी

काशीदच्या जंगल जेट्टीचे 73 कोटी पाण्यात?
तरंगत्या जेट्टीसाठी 51 कोटींचा नवा प्रस्ताव

| मुरूड | सुधीर नाझरे |

सागरी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या काशीद किनाऱ्यावर अत्याधुनिक जेट्टी उभारण्याचा मेरीटाईम बोर्डाचा प्रयत्न फसला आहे. तरंगती जेट्टी उभारण्याची गरज असताना त्या ठिकाणी जंगल जेट्टी उभारल्याने तब्बल 73 कोटी रुयांचा निधी पाण्यात गेला आहे. जेट्टी उभारताना तज्ज्ञांच्या सर्वेक्षणाचा आधार घेतला नसल्याने जेट्टीसाठी आणलेले दगड वाहून गेले आहेत. काशीदकिनाऱ्यावर कोट्यवधी रुपयांच्या जेट्टीच्या कामाचा कसलाच मागमूस दिसत नाही. मेरीटाईम बोर्डाला उशिराने शहाणपण सुचल्याने त्यांनी तज्ज्ञांकडून सर्वेक्षण केले असून या पथकाने तरंगती जेट्टी उभारण्याचा अभिप्राय दिला आहे. यामुळे जेट्टी उभारण्यासाठी 51 कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. याआधी 112 कोटींची निविदा मंजूर झाली आणि आता त्याच ठिकाणी पुन्हा 51 कोटी रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे. यामुळे पर्यटनासाठी उभारण्यात येणाऱ्या जेट्टीची निर्मिती नक्की पर्यकांसाठी की ठेकेदारांसाठी उभारण्यात येत आहे असा सवाल नागरिक विचारात आहेत.

मुरुड तालुक्यातील काशीद या ठिकाणी अत्याधुनिक जेट्टी बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून 23 जानेवारी 2019 रोजी शासकीय आदेश काढण्यात आला. या कामासाठी 112 कोटी 46 लाख रुपये मंजूर करून या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. किनाऱ्यावरील समुद्रातील भागात भिंत उभारण्याचे काम सुरु असतानाच पर्यटकांसाठी चालणाऱ्या जहाजांच्या नावाड्यांच्या पथकाने परीक्षण केले. प्रवासी उतरण्यासाठी ही जेट्टी सुरक्षित नाही. असा अभिप्राय त्यांनी दिला. यामुळे जेट्टीचे काम थांबविण्यात आले. जेट्टीच्या उभारणीतील एक भाग असणाऱ्या पाण्यातील भिंतीच्या निर्मितीमध्ये तब्बल 73 कोटी खर्च झाले आहेत. दरम्यान भिंत उभारण्यासाठी समुद्रात टाकलेले दगड आता गायब झाले आहेत.

प्रवासी जहाजांच्या नावाड्यांनी जेट्टी वापरण्यास नकार दिल्यावर बंगलोर येथील तज्ज्ञ मंडळाला 23 लाख रुपयांचे शुल्क देऊन जेट्टीच्या परीक्षणाचे काम देण्यात आले. परीक्षण पथकाने काशिदला येऊन पाहणी केली. पुढील 100 वर्षे सर्व जहाजांना उतरण्यास सोपे जाईल अशी तरंगती जेट्टी बनविण्याचा अभिप्राय या पथकाने दिला. त्याप्रमाणे मेरीटाईम बोर्डाने नवीन तरंगत्या जेट्टीचा 51 कोटींचा प्रस्ताव बनवून शासनाला सादर केला आहे. पुढील महिन्यात या प्रस्तावाला मंजूरी मिळून जानेवारीपर्यंत कामाला सुरवात होईल अशी माहिती मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी दिली. जेट्टीच्या कामात दिरंगाई झाली ही बाब अभियंता देवरे यांनी मान्य केली आहे. ते म्हणाले की, मध्यंतरी कोरोनामुळे काम बंद होते. त्यानंतर चक्रीवादळामुळे बंधाऱ्यासह संबंधित ठेकेदाराचे नुकसान झाले.काही दिवस ठेकेदाराने काम बंद ठेवलेे.त्यावर त्याला दंडसुद्धा आकारण्यात आला. आता त्याने काम सुरु केले आहे. जेट्टीचे काम लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.


जेट्टीची पूर्ण न झालेली कामे
मेरीटाईम बोर्डाकडून पूर्वीच्या जेट्टीचे काम 60 टक्के पूर्ण झाल्याचा दावा कऱण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्ष पहाणी केली असता एवढ्या प्रमाणात काम झालेले दिसून येत नाही. तरीही 73 कोटी खर्च झालेत असे अधिकारी सांगत आहेत. प्रवासी जेट्टी व रो-रो सेवा यासाठी 3 कोटी 45 लाख 43 हजार 448 रुपये प्रास्तावित खर्च मंजूर असून हे काम पूर्ण झालेले दिसून येत नाही. पर्यटकांची वाहने वाहनतळ बांधकामासाठी 6 कोटी 81 लाख 30 हजार 133 रुपयांचा आराखडा तयार करून सुद्धा हे काम अपूर्ण आहे. काशीद जेट्टीवर येण्याजाण्यासाठी असणारा संलग्न रस्ता तयार करण्यासाठी 7 कोटी 3 लाख 63 हजार 225 रुपये मंजूर असताना हे काम सुद्धा पूर्ण झालेले नाही. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी टर्मिनल इमारतीसाठी 1 कोटी 8 लाख 61 हजार 976 रुपये मंजूर असूनसुद्धा हे काम अर्धवट अवस्थेत आहे. पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी समुद्रात भिंत निर्माण करण्यासाठी 73 कोटी खर्च झालेत पण बंधारा दिसत नाही.
Exit mobile version