। सुतारवाडी । प्रतिनिधी ।
कोलाड रेल्वे फटकाजवळ उड्डाणपुलाची अत्यंत आवश्यकता आहे. या ठिकाणी उड्डाणपूल उभारल्यास दोन्ही बाजूंनी येणा-जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होणार नाही.
कोलाड रेल्वे स्टेशनमधून या अगोदर रेल्वेमधून अवजड सामान घेऊन ट्रक नेण्यासाठी रो-रो हाऊसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून अनेक अवजड सामान घेऊन जाणारे ट्रक रो-रो हाऊसने जात असतात. काही दिवसापूर्वी येथूनच रेल्वेमधून कार नेण्यासाठी सुद्धा रो-रो हाऊसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोलाडमार्गे सुतारवाडी येथून पुण्याकडे जाण्यासाठी केवळ 110 कि.मी अंतर आहे. त्यामुळे पुण्याकडे जाण्यासाठी तसेच तेथून सुतारवाडीमार्गे कोलाडवरून मुरुड, जंजिरा, अलिबाग, मुंबई, ठाण्याकडे जाणारी अनेक लहान-मोठी वाहन कोलाड फाटकाजवळ आल्यानंतर त्याचवेळी
रेल्वे येत असेल तर फाटक बंद होतो. अशावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांची रांगच रांग लागते. फाटक उघडल्यानंतर दुचाकी किंवा तीन चाकी वाहन मधूनच पर्यायी मार्ग शोधत मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे कधीकधी दोन्ही बाजूंनी रस्ता जाम होतो. पनवेल ते इंदापूर चौपदरी करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून येणा-जाणाऱ्या वाहनांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कोलाड येथील रेल्वे फाटकाजवळ उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक आहे.







