| रसायनी | राकेश खराडे |
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रसायनी-खालापूर हद्दीत मागील दहा वर्षांत अपघातांनी हजारांचा टप्पा ओलांडला आहे. येथील अपघाताचे वाढते प्रमाण हे चिंताजनक असून, खालापूर येथे ट्रामा सेंटर अत्यंत गरजेचे झाले आहे, त्यामुळे अपघातानंतर तातडीची मदत मिळण्यास मदत होईल, असे स्थानिकांचे मत आहे. ब्रिटिशकाळात बांधण्यात आलेला जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग-4 वरील अपघात कमी व्हावेत आणि जलद प्रवास करता यावा, यासाठी द्रुतगती मार्ग बांधण्यात आला. अवघड आणि कायम वाहतूककोंडी असलेला बोरघाटाचा प्रश्न सहापदरी द्रुतगती मार्गाने संपला; परंतु वेगमर्यादा 80 असतानाही अधिकचा वेग आणि लेनच्या शिस्तीचे पालन न केल्यामुळे अपघात होत आहेत. खालापूर हद्दीतील आकडेवारी चिंताजनक आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रसायनी-खालापूर हद्दीत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या परिसरात जखमींवर तातडीने उपचार होण्यासाठी सुसज्ज रुग्णालय असावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीला टिम,आयआरबीची डेल्टा फोर्स, देवदूत पथक, वाहतूक पोलीस तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था मदतीसाठी धावून जाते. गंभीर जखमींना पुणे तसेच नवी मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात येते. खालापूर परिसरात 20 किलोमीटर अंतरात गंभीर जखमींवर आवश्यक उपचार होतील, असे रुग्णालय नसल्याने लांबचा पल्ला गाठावा लागतो. रसायनी-खालापूर ट्रामा केअर सेंटर आणि कंटेनर यार्डचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे. द्रुतगती मार्गावर उर्सेनजीक ट्रामा केअर सेंटर सुरु करण्यात आले; परंतु खालापूर हद्दीतील अपघाताची संख्या पाहता खालापूर अथवा रसायनीत सुसज्ज ट्रामा केअर सेंटर उभे राहणे गरजेचे आहे. जेणेकरून अपघात घडल्यास त्वरीत उपचार सुरू होतील आणि अपघात झालेल्यांचा जीवही वाचवता येईल. याशिवाय मुंबई-पुणे महामार्गावरील खालापूर हद्दीतील अपघातग्रस्तांकडून ट्रामा केअर सेंटरची मागणी होत आहे.







