माथेरानमध्ये स्पायरल पार्किंग हवे

स्थानिकांकडून होतेय मागणी

| माथेरान | प्रतिनिधी |

वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे नेहमीच गाड्यांना पार्किंग करण्यासाठी जागा अपुर्‍या पडत आहेत. दस्तुरी नाक्यावर वनखात्याच्या जागेत सर्वत्र जंगलांनी व्यापलेल्या या ठिकाणी जवळपास एक हजार गाड्यांची सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी येथील बोरीचे मैदानात स्पायरल पार्किंग विथ फॅब्रिकेशन वर्क्सच्या सहाय्याने व्यवस्था केल्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

माथेरान रेल्वेच्या अवघ्या दोन फेर्‍यांमुळे होणार्‍या प्रवासाला त्रासून सर्वच पर्यटक नाईलाजाने स्वतःच्या मोटार गाड्या अथवा खासगी वाहनांच्या सहाय्याने माथेरान गाठण्यासाठी धावपळ करीत असतात. परंतु, वाहनतळ असलेल्या तसेच माथेरानकरांच्या व्यावसायिक दृष्टीने माथेरानचा उंबरठा समजल्या जाणार्‍या दस्तुरी या ठिकाणी आल्यावर सुट्ट्यांच्या हंगामात इथल्या अपुर्‍या जागेमुळे बाहेर पडताना पर्यटकांची त्रेधातिरपीट उडते. अनेकदा घोडेवाले, हमाल, रूम एजंट यांच्या गर्‍हाड्यातून निसटणे म्हणजे त्यांना एकप्रकारे अग्निदिव्य पार करून बाहेर यावे लागत असते.

चार वर्षांपूर्वी एमएमआरडीए च्या माध्यमातून याच पार्किंग साठी जवळपास पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता त्याचा विनियोग चुकीच्या पद्धतीने केल्यामुळेच अशी अवस्था निर्माण झाली आहे. याच पैशांत सुसज्ज स्पायरल पार्किंग झाली असती परंतु तत्कालीन लोकप्रतिनिधीनी भविष्याचा विचार न केल्यामुळे आज पार्किंगची दयनीय अवस्था आहे.

सध्या जरी दस्तुरी येथील अपुर्‍या पार्किंगच्या गैरसोयीमुळे जुमापट्टी येथे गाड्यांना आश्रय दिला गेला. तरी आगामी काळात याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात याच भागातील बोरीचे मैदान येथे नाविन्यपूर्ण अशी जवळपास 1000 गाड्यांची जादा पार्किंगची सोय होणेकामी स्पायरल पार्किंग सोबतच फॅब्रिकेशन वर्क्स अशाप्रकारे पार्किंगची अद्ययावत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सातत्याने पर्यटन हंगामात होणारी वाहतूक समस्या यामुळे अनेक पर्यटकांना आपली वाहने घेऊन माथेरानला येता येत नाही. ती अर्ध्या घाटात किंवा जुमापट्टी येथे उभी करून पुढील वेळखाऊ प्रवास करावा लागतो. याकरिता वनविभागाने आपल्या अखत्यारीत असणार्‍या माऊंटबेरी येथे रस्ता करून पार्किंगची व्यवस्था केल्यास फार मोठ्या प्रमाणात समस्या मार्गी लागेल.

शिवाजी शिंदे
माजी विरोधी पक्षनेते, माथेरान

माथेरानला पर्यटन हंगामात 1000 गाड्या पार्क होतील अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने एमपी 93 हा प्लॉट नगरपरिषदेकडे वर्ग करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याजागी तीन मजली स्पायरल पार्किंगची व्यवस्था करता येईल, सद्यस्थितीत येणार्‍या सर्व गाड्यांची पार्किग वनविभागाच्या जागेवर केवळ जागेचे भाडे घेऊनन केली जाते. यामुळे माथेरान च्या उत्तम पर्यटनासाठी अद्ययावत पार्किंगची नितांत आवश्यकता आहे.

योगेश जाधव,
अध्यक्ष,
वन व्यवस्थापन समिती माथेरान

Exit mobile version