नीरज चोप्राची रौप्यफेक; 19 वर्षानंतर भारताला पदक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केलं. लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने 90.54 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं.
युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्‍चित केलं होतं. रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नात नीरज चोप्राने 88.13 मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्यपदक आपल्या नावे केलं. 24 वर्षीय नीरजने अग्रस्थान मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरला असता.

भालाफेक दरम्यान परिस्थिती चांगली नव्हती. वार्‍याचा वेग खूप जास्त असताना, मी चांगली कामगिरी करेन असा मला विश्‍वास होता. मी निकालावर समाधानी आहे, मला आनंद आहे की मी माझ्या देशासाठी पदक जिंकू शकलो.
नीरज चोप्रा,भालाफेकपटू

Exit mobile version