गवत, झुडपांच्या विळख्याने झाले भकास; स्थानिकांसह पर्यटकांची घोर निराशा
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे येथे उभारण्यात आलेल्या वन उद्यानाची अवस्था बिकट झाली आहे. या उद्यानाला गवत, झुडपांनी विळखा घातला आहे. त्यामुळे तो संपूर्ण परिसर भकास झाला आहे. पर्यटन व स्थानिकांच्या दृष्टीने फिरण्यासाठी महत्त्वाचे असलेले हे ठिकाणी दुर्लक्षित झाले आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची घोर निराशा झाली आहे. वनविभाग याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पर्यटनवाढीला चालना देण्याबरोबरच वनांचे महत्त्व स्थानिकांना समजावे, यासाठी अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळेदरम्यान सामाजिक वनीकरण विभागामार्फत उत्तमराव पाटील जैवविविधता वन उद्यान गेल्या पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. रस्त्याला लागूनच काही अंतरावर हे उद्यान उभारल्याने या उद्यानात फिरण्यास येणार्यांचा कलही वाढला. या उद्यानामध्ये ऐतिहासिक वास्तूंसह वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचे साहित्य व वेगवेगळ्या प्राणी, पक्ष्यांचे पुतळे उभारण्यात आले होते. आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडांनी हा परिसर फुलून गेला होता. त्यामुळे या उद्यानात येणार्यांची संख्यादेखील प्रचंड वाढली. सकाळ-संध्याकाळच्या दरम्यान स्थानिक या उद्यानात फिरण्यास आवडीने येत होते. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या उद्यानात फिरण्याचा आनंद स्थानिक व पर्यटक मनमुरादपणे घेत होते. आबालवृद्धांपासून महिला, तरुणवर्ग मोठ्या संख्येने या उद्यानात येत होते. या उद्यानासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणवर्गामध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
या उद्यानात फिरण्याचा एक वेगळा आनंद स्थानिकांना व पर्यटकांना मिळत होता. लहान मुलेदेखील उत्स्फूर्ततेने या उद्यानात बागडत होती. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून हे उद्यान बंद झाले आहे. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांची घोर निराशा झाली आहे. उद्यानावर केलेला खर्च पाण्यात गेला आहे. या उद्यानाला गवत, झुडपाने विळखा घातला आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून आता हे उद्यान वन विभागाकडे वर्ग केले आहे. परंतु, वनविभागाकडूनदेखील त्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती करण्यात आली नाही. उद्यान उभारण्यासाठी आराखडा तयार असल्याचा दावा या विभागाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. चौल हा भाग ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पर्यटनवाढीला चालना देण्याचा प्रयत्न वन विभागाने केला आहे. परंतु, हा प्रयत्न कधी यशस्वी होईल, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
नव्याने उभारणीसाठी वन संयुक्त समितीची प्रतीक्षा
वनांचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने गावांतील ग्रामस्थांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी संयुक्त वन समिती गठीत केली जात आहे. या समितीच्या मदतीने वन क्षेत्रात वेगवेगळ्या योजना राबवून वनांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, चौल-भोवाळे येथील वन उद्यान नव्याने उभारण्यासाठी संयुक्त वन समितीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासन राज असल्याने समिती गठीत करण्यास अडचण येत आहे. वन विभागाचा आराखडा तयार आहे. परंतु, समितीअभावी हे उद्यान नव्याने बांधण्याचे काम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
चौलमधील वन उद्यान सामाजिक वनीकरण विभागाकडून वर्ग झाले आहे. त्याची पाहणी करण्याच्या सूचना वनपाल यांना केल्या आहेत. त्या ठिकाणी काही सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
नरेंद्र पाटील,
वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग
