कालव्याच्या साफसफाईकडे दुर्लक्ष

। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव तालुक्यातील शेतीला काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी डाव्या कालव्यातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात साधारणतः 15 तारखेनंतर सोडले जाते; मात्र यंदा 15 डिसेंबर उलटून गेले तरी अद्यापही कालवा साफसफाईला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे कालव्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ, प्लास्टिक, कचर्‍याचा खच, झाडीझुडपे, रान वाढले आहेत.

रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ येथे बंधारा बांधण्यात आला आहे. 1974 मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. 1976 पासून प्रत्यक्ष सिंचन सुरू झाले. त्यानुसार बंधार्‍यातील पाण्याची विभागणी करण्यात आली. औद्योगिक वापरासाठी 47 दशलक्ष घनमीटर, पिण्यासाठी सात, सिंचनासाठी 156 दशलक्ष घनमीटर इतकी तरतूद करण्यात आली आहे. भिरा येथील टाटा जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मितीनंतर वर्षाकाठी उपलब्ध होणार्‍या पाण्याचा सिंचनासाठी वापर होतो. तर, बंधार्‍यावर डावा आणि उजवा कालवा बांधण्यात आला आहे. माणगाव तालुक्यातील शेतीला डाव्या कालव्यातील पाणी सोडण्यात येते. उजव्या कालव्यातून तालुक्यातील शेतीला पाणी सोडण्यात येते. हे पाणी दरवर्षी 15 डिसेंबर ते 15 एप्रिल या कालावधीत सोडण्यात येते; मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नाही.

रब्बी हंगामातील पीक शाश्‍वत असून शेतकरी भातपिकाची लागवड करतो. त्यामुळे कालव्याची कामे शासनाने वेळीच हाती घेऊन पाणी सोडल्यास माणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल, असे शेतकरी सांगत आहेत. शहरातील कालवे ओस पडले आहेत. डिसेंबरचा पंधरवडा संपला आहे. तरीदेखील कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यातच कालव्याची साफसफाई न झाल्याने मोठ्या प्रमाणात त्यामध्ये कचरा साचला आहे. शिवाय प्लास्टिकचा खच पडला आहे.

Exit mobile version