| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील गोवे येथील बौद्धवाडीजवळ वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल वाकल्यामुळे येथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याकडे महावितरण कंपनीचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
बुधवारी (दि.19) आलेल्या वादळी पावसामुळे बौद्धवाडी जवळील विद्युत पोल पूर्णपणे वाकला यामुळे विद्युत पोलावरील विद्युत वाहक तारा खाली लोंबकळत पडल्या आहेत. या वाकलेल्या खांबाच्या भारामुळे बाजूचे विद्युत खांब ही वाकून पडण्याच्या स्थितीत आहेत. अशा परिस्थितीत या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शिवाय याच मार्गाने शेतकऱ्यांची गुरे चरण्यासाठी जात असतात. चुकून ही गुरे खाली आलेल्या विद्युत तारांच्या बाजुने गेल्याने मोठा अनर्थ घडू शकतो.
अशा परिस्थिती थोडा जरी वारा आला तरी खाली आलेल्या विद्युत तारा एकमेकांना चिकटतात. यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे विद्युत उपकरणांवर याचा परिणाम होत आहे. याविषयी कोलाड महावितरणकडे ग्रामस्थांनी तक्रार केली होती. परंतु, अद्याप महावितरणकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे महावितरणच्या बेजबाबदारीमुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार महावितरण कंपनी असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया गोवे ग्रामस्थांकडून केली जात आहे.
महावितरण कंपनीचे दुर्लक्ष
