माजी मुख्याध्यापक प्रवीण चौलकर यांचे प्रतिपादन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, खेळाडूंनी मोबाईलच्या जमान्यात मैदानी खेळांकडे दुर्लक्ष करू नये, समरस होऊन खेळाचा आनंद लुटावा जेणेकरून शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास होऊन संघभावना जोपासावी, असे आवाहन माजी मुख्याध्यापक प्रवीण चौलकर यांनी केले. हिंदू एज्युकेशन सोसायटी संचलित ओंकार विद्या मंदिर, मुरुड येथे आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
यावेळी हिंदू एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप जोशी, ओंकार विद्या मंदिर अध्यक्षा दीपाली जोशी, प्रमुख अतिथी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रीता चौलकर, विश्वस्त मनोहर गुरव, उपमुख्याध्यापिका अश्विनी पाटील, शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रीता चौलकर यांनी ओंकार विद्या मंदिरात केलेल्या संस्कारांच्या शिदोरीमुळे चांगले विद्यार्थी घडल्याने ते आज मोठ्या पदांवर कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो असे सांगून शाळेच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. इ.5 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे क्रीडास्पर्धेत सहभागी आणून रंगत आणली. प्रास्ताविक दीपाली जोशी यांनी तर आभारप्रर्दशन अश्विनी पाटील यांनी केले.