डोस दिल्यानंतर नवजात बालकाचा मृत्यू

महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
| महाड | प्रतिनिधी |
सहा महिन्यांच्या बालकाला सहा महिन्यांनंतर दिला जाणारा डोस दिल्यानंतर ताप आला आणि तापाकरिता दिलेल्या गोळीने या बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप या बालकाच्या पालकांनी केला आहे. याबाबत महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

महाड औद्योगिक पोलीस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, वाघोली आदिवासीवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची एक महिला नर्स आणि मांघरून येथील एक महिलेने मालती प्रदीप पवार यांच्या घरी जाऊन त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा वृषभ प्रदीप पवार याला सहा महिन्यांनंतर केले जाणारे लसीकरण केले. लसीकरण केल्यानंतर ताप येईल आणि याकरिता एका गोळीचे चार तुकडे करून गोळीचा एक भाग त्याला द्या असे सांगून निघून गेल्या. वृषभ याला झोळीत झोपवले असता दुपारी दोन वाजता रडू लागल्याने मालती पवार यांनी अर्धी गोळी दुधातून दिली. मात्र, वृषभ याने वाकडे तिकडे होत डोळे फिरवले.

यामुळे त्याला बिरवाडी प्राथमिक आरोग्य केद्रात आणले असता त्याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मयत मुलाच्या आईने महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात आलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पी.पी. शास्त्री हे तपास करत आहेत.

Exit mobile version