ग्रामसभेतील निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीमधील कल्याण- कर्जत रस्त्याच्या बाजूला दुकाने थाटली होती. ही दुकाने रस्त्याच्या जागेत असल्याने ती अतिक्रमणे काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी ग्रामसभेत ठरावाद्वारे करण्यात आली होती. त्यावेळी सदर अतिक्रमणे आठ, दिवसात काढून टाकण्यात येतील, असे जाहीर केले होते. मात्र, तेथे अतिक्रमण काढताना केवळ दिखाऊपणा दिसत असून, संपूर्ण अतिक्रमण काढून टाकण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्याच्या बाजूला असलेली जिजामाता तलावाच्या पाठीमागील एका विकासकाने उभारलेल्या नऊ अनधिकृत गाळ्यांचा मुद्दा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्यानंतर संबंधित विकासकाकडून काही गाळ्यांवरील पत्रे काढण्यास सुरुवात करण्यात आली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नऊ गाळ्यांच्या अनधिकृत बांधकामाचा मूळ प्रश्न अद्याप कायम असताना केवळ दोन गाळ्यांवरील पत्रे काढून कारवाई झाल्याचा आभास निर्माण केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणावर ठोस निर्णय घेण्याऐवजी ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर हे नऊ गाळे नियमबाह्य पद्धतीने उभारले गेले असतील तर त्यावर सर्वंकष कारवाई का केली जात नाही? केवळ दोन गाळ्यांपुरती मर्यादित हालचाल करून संपूर्ण प्रकरण निकाली लागल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी वस्तुस्थिती स्पष्ट करून नऊ गाळ्यांबाबत नेमकी काय भूमिका आहे, याची माहिती ग्रामस्थांसमोर मांडावी, अशी मागणी होत आहे. जोपर्यंत संपूर्ण अनधिकृत बांधकामाबाबत स्पष्ट आणि ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत ग्रामस्थांचे मागणी कायम राहील, असे ग्रामस्थ शाम कडव यांनी जाहीर केले आहे.
