फोटो कॉपीप्रमाणे गणेशमूर्तीसाठी नेरळ प्रसिद्ध

शाडूच्या मूर्ती ठरताहेत आकर्षण

। नेरळ । प्रतिनिधी ।

प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील गणेश भक्तात नेरळ येथील गणेश मूर्ती बनविणारा कारखाना प्रसिद्ध आहे. फोटो कॉपीप्रमाणे गणेश मूर्ती बनविणारा कारखाना अशी ओळख असलेल्या कारखान्यात केवळ शाडूच्या मूर्ती बनविल्या जातात. रंगसंगतीसाठी प्रसिद्ध असलेल्या नेरळमधील कुंभारवाड्यातील गणेशमूर्ती या कायम आकर्षण राहिल्या आहेत.

नेरळमधील कुंभारआळी आणि तेथील कुंभारवाडा हा खास गणपती बाप्पाच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. 70 वर्षे दहिवलीकर यांच्या कारखान्यात शाडूच्या मातीपासून बनविल्या जाणार्‍या गणेशमूर्ती या घडविल्या जातात. कुंभार आडनावाचे दहिवलीकर झाले पण त्यांची या महागाईच्या जमान्यात शाडूच्या मातीपासून बनविल्या जाणार्‍या मूर्ती यांची आवड काही कमी झाली नाही. कर्जत तालुक्यात शाडूच्या मातीचे म्हणजे पर्यावरण पूरक मातीपासून बनविले जाणार्‍या गणेशमूर्ती यांचे निवडक कारखाने आहेत. त्यात नेरळ येथीळ दहिवलीकर यांचा पूर्वीचा श्री गणेश कलाकेंद्र आणि आताचे सिद्धेश गणेश कला केंद्र हा कारखाना आघाडीवर आहे.

दहिवलीकर यांची तिसरी पिढी शाडूच्या मातीपासून मूर्ती घडवत आहेत. त्यात महिलादेखील आघाडीवर असून प्रामुख्याने रंगकाम करण्याचे काम महिला करीत असतात. महागाई असली तरी नेरळ मधील सिद्धेश कला केंद्रामध्ये गणेश भक्तांची एप्रिल महिन्यापासून ये-जा सुरू होते. त्याचे कारण म्हणजे फोटोप्रमाणे गणेशमूर्ती बनवून दिल्या जात असल्याने नेरळ येथील गणेश मूर्ती ठाणे-मुंबईत प्रसिद्ध आहेत. शाडूच्या मूर्ती घडवून कमी नफा मिळत असला तरी दहिवलीकर कुटुंबे ही आनंदी आहेत. शाडूच्या मातीच्या मूर्ती या पेणच्या प्रसिद्ध गणेशमूर्तीच्या तोडीच्या असल्याने गुजरातवरून दरवर्षी अधिक किंमत मोजून माती आणूनदेखील ही कुटुंबे आनंदी आहेत.

Exit mobile version