। नेरळ । प्रतिनिधी ।
फोटोकॉपीप्रमाणे गणेशमूर्ती बनविला जाणारा कारखाना अशी ओळख असलेल्या नेरळ येथील कारखान्यात केवळ शाडूच्या मूर्ती बनविल्या जातात. पर्यावरणपूरक मूर्तीनां विशेष मागणी असते. विशेष करुन ठाण्यातील गणेशभक्त या मूर्ती मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
येथील मूर्ती कारखान्याला 70 वर्षाची परंपरा आहे. महागाई आली तरी भक्तांचे प्रेम कमी झाले नाही हे नेरळ कुंभारवाडामध्ये असलेल्या कारखान्यात होणारी गर्दी बघितली की लक्षात येते. शाडूच्या मातीचा कारखाना हा कर्जत, पनवेल या भागातील गणेशभक्तांना जवळचा वाटतो. तसा तो ठाणे जिल्ह्यातील गणेशभक्तांना देखील आपला वाटतो. गेली सात दशके दहिवलीकर यांच्या कारखान्यात केवळ शाडूच्या मातीपासून बनविल्या जाणार्या गणेशमूर्ती घडविल्या जातात.
दहिवलीकर यांचा पूर्वीचा श्री गणेश कलाकेंद्र आणि सध्याचा सिद्धेश गणेश कला केंद्र हा कारखाना आघाडीवर आहे. त्यांची तिसरी पिढी शाडूच्या मातीपासून मूर्ती घडवत आहेत. त्यात महिला देखील आघाडीवर असून प्रामुख्याने रंगकाम करण्याचे काम महिला करतात.
वामन कुंभार यांनी 70 वर्षापूर्वी शाडूच्या मूर्ती बनविण्याचा कारखाना सुरू केला. त्यावेळी त्यांच्यासोबत नारायण रामा दहिवलीकर आणि हरिभाऊ तुकाराम दहिवलीकर हे शाडूच्या मातीपासून बनविलेल्या मूर्ती बनवायचे. शाडूच्या मूर्ती घडवून कमी नफा मिळत असला तरी दहिवलीकर कुटुंब आनंदी आहेत.
येथील मूर्ती या पेणच्या तोडीच्या असल्याने गुजरातवरून दरवर्षी अधिक किंमत मोजून माती आणून देखील ही कुटुंबे आनंदी आहेत. 1 फुटपासून पाच फुटापर्यंत उंचीच्या गणेशमूर्ती घडविण्याचे काम नेरळ येथे कुंभारवाडामध्ये होत आहे. त्या ठिकाणी मूर्ती जून महिना सुरू होण्याआधी पूर्णपणे बुक होतात. हे प्रेम देखील दहिवलीकर कुटुंब यांना त्यांच्या आकर्षक रंगसंगतीमुळे मिळाले आहे.
रविंद्र दहिवलीकर, मिलिंद दहिवलीकर, सिद्धेश दहिवलीकर, प्रमोद दहिवलीकर, प्रशांत दहिवलीकर, विनायक दहिवलीकर यांच्यासह मिताली दहिवलीकर, रंजना दहिवलीकर, विद्या गोरे, रिभा वारगावकर, प्रदीप तुपगावकर, श्वेता एडगावकर यांचे हात गणेश मूर्तीवरून फिरत आहेत. सध्या शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. भाद्रपद महिना सुरू झाला की, लांबचे गणपती तेथील गणेश भक्त घेऊन जाण्यासाठी येतात.
आजोबांनी सुरू केलेली परंपरा काय नफा मिळतो हे न पाहता कायम ठेवली आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि महागाई प्रचंड वाढली असताना देखील 70 वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे मूर्ती घडवायचो, अगदी त्याच प्रेमाने मूर्ती घडवित आहोत.त्यात येणार्या प्रत्येक वस्तूंवर जीएसटी द्यावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक गणिते जुळविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र ग्राहकांचा समाधान हेच आमचे भांडवल आम्ही समजत आहोत.
मिलिंद दहिवलीकर-मूर्तिकार
कलेच्या माध्यमातून कायम चांगले देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कितीही किचकट फोटो जरी दिले तरी आम्ही सर्वस्व त्यात ओतून मूर्ती घडवितो. त्यामुळे गणेशभक्तांना या कारखान्याबाबत विश्वाास वाटतो.
प्रमोद दहिवलीकर-मूर्तिकार