नेरळ-कळंब रस्ता खड्डेमय

संपूर्ण गणेशोत्सवात भक्तांचा खड्ड्यातून प्रवास; दहिवली पुलावरून जड वाहतूक सुरूच

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ-कळंब रस्त्यावर नागरिकांना संपूर्ण गणेशोत्सवात खड्ड्यातून प्रवास करावा लागला असून या खड्ड्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

नेरळ-कळंब हा महत्वाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. परंतु, या रस्त्याची खड्डयांमुळे अत्यंत दुरावस्था झाली असून वाहने चालवणे कठीण झाले आहे. या मार्गांवरील दहिवली पूल, कोदिवली, अवसरे, पोही भागात मोठे खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव पार पडला तरीही रस्तावरील खड्डे भरले नाहीत. त्यामुळे संपूर्ण गणेशोत्सवात खड्ड्यातून प्रवास करावा लागला आहे. तसेच, धोकादायक पूल घोषित केलेल्या दहिवली पुलावरून जड वाहतूक सुरूच आहे. कोणताही सुरक्षारक्षक तेथे उपलब्ध नसतो, त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी थोडी लाज बाळगून या रस्त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

गणेशोत्सव काळात खड्डे भरले नाही. त्यामुळे गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जनदेखील खड्डयांतून प्रवास करून झाले. आता गणपती बाप्पा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगली बद्धी दे आणि आमचा प्रवास प्रवास सुखाचा होऊ दे, अशी प्रार्थना नागरिक, प्रवासी, आणि वाहनचालक करत आहेत.

अपघात घडल्यास जबाबदार कोण?
दहिवली पूल हा जड वाहनांसाठी बंद करण्यात आल्याचे फलक तेथे लावण्यात आले आहे. परंतु, तरीही एस.टी महामंडळाची बस सेवा, तसेच मोठेमोठे टेम्पो पुलावरून जात आहेत. कोणत्याही प्रकारचा सुरक्षारक्षक तेथे उभा करण्यात आला नाही. त्यामुळे जर पुलावर मोठा अपघात घडला तर त्याला जबादार कोण?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
दहिवली पुलावरील नवीन पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. परंतु, हे काम बंद अवस्थेत असल्याने हे काम कधी पूर्ण होईल सांगता येत नाही. जुन्या पुलावरून दरवर्षी पुराचे पाणी जाऊन वाहतूक बंद होत असते. यावर्षी देखील 3 वेळा पुलावरून पाणी जाऊन वाहतूक बंद होती. पुराच्या पाण्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पुलाची रेलिंगदेखील तुटली आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहेत. परंतु याकडे लक्ष देण्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही.
Exit mobile version