नेरळ-कळंब रस्ता अपूर्णावस्थेत

सार्वजनिक बांधकाम विभागाची अकार्यक्षमता
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील अत्यंत खराब झालेल्या माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलन करून केली होती. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्‍वासन दिले होते. दरम्यान, आंदोलनाच्या दिवशी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरुवात केली. मात्र याला10 दिवसांचा कालावधी लोटला असून केवळ खोदकाम करून ठेवण्यात आले. कोणत्याही प्रकारचे काम सुरु केले नाही.

गेली अनेक वर्षे नेरळ-कळंब रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभागाने नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ साई मंदिर पासून पुढे 900 मीटर चा रस्ता आरसीसी डांबरीकरण तर पुढे या रस्त्यातील चार किलोमीटर भागात डांबरीकरण केले जाणार आहे. मनसेने 26 नोव्हेंबर रोजी आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु केल्याचे जाहीर केले,आंदोलन केले त्या दिवशी संध्याकाळी रस्त्यावर जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदकाम सुरु करण्यात आले असून गेल्या दहा दिवसात 300 मीटर भागात खोदकाम करण्यात आले आहे. सात मीटर रुंदीचा रस्ता दोन भागात केला जाणार असून त्या रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रीटीकरण करण्यासाठी बांधकाम विभागाने नेमलेल्या ठेकेदाराने काम सुरु केले. पण केवळ खोदकाम करून काम थांबले असून या रस्त्यावरील एका बाजूचा रस्ता खोदकामामुळे बंद पडला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु असून काहीवेळा रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या मागणीसाठी अनेक वर्षे अग्रेसर असलेल्या जय मल्हार रिक्षा संघटनेने रस्त्याचे काम जलदगतीने करण्याची मागणी केली आहे. एका बाजूने खोदकाम केले जात असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या ठिकाणी रस्त्यावर आरसीसी काँक्रिटीकरणाचे काम देखील सुरु करावे अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. कारण या रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ठेकेदाराला काम सुरु करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी रिक्षा संघटनांचे सल्लागार रमेश कडव यांनी केली आहे.

Exit mobile version