। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ साई मंदिर नाक्यावरील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण काम मंजूर आहे.त्या रस्त्यावर 900 मीटरचा भाग सिमेंट काँक्रीटचा बनविला जाणार आहे.त्यापैकी चार मीटर रस्त्याचा एक भाग काँक्रीटीकरण झाल्यांनतर महिनाभर बंद असलेले काँक्रीटचे काम पुन्हा सुरु झाले आहे.मात्र 900 मीटर लांबीचा रस्ता पावसाळ्यापूर्वी काँक्रीटीकरण होऊन तयार होणार काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नेरळ साई मंदिर नाका ते कळंब रस्त्यावर 900 मीटर चा रस्ता डांबरीकरण केला जाणार आहे. त्या रस्त्यावर चार मीटर भागात एक लेन काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. त्याची दुसरी बाजू आणि उर्वरित 500 मीटर रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार हा कठीण प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा दोन महिन्यावर आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेडर कंपनीला काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेण्यासाठी सूचना करण्याची गरज आहे. या रस्त्याचा 400 मीटर लांबीचा एक भाग पूर्ण असून दुसर्या लेन चे काम सुरु झाले आहे. पण त्या पुढील 500 मीटर लांबीचा रस्ता याचे काम कधी सुरु होणार याबद्दल संभ्रम आहे. दुसरीकडे पावसाळा तोंडावर आला असल्याने आणि ज्या 500 मीटर च्या भागातील रस्त्याचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही त्या ठिकाणी काँक्रीटकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग खोदाई देखील करून ठेवली आहे.
त्यामुळे पावसाळा वेळेवर सुरु झाला आणि पाणी रस्त्यावर साठून राहिल्यास मोठी अडचण रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यास निर्माण होणार आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने काँक्रीटकरणाचे काम तात्काळ हाती घेण्याची गरज अशी मागणी नेरळ येथील जय मल्हार रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्रावण जाधव आणि इको रिक्षा संघटनेचे अध्यक्ष केशव तरे यांनी केली आहे.







