भिंतीना तडे, दरवाजे-खिडक्यांना गंज; प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथे तालुक्यातील सर्वात मोठे ओळखले जाणारे नेरळ पोस्ट ऑफिस अक्षरशः धोकादायक अवस्थेत आहे. पावसाळ्यात छप्पर आणि भिंतींमधून पाणी पाझरत असून, भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. दरवाजे-खिडक्या कुजून गंजल्या आहेत. कुठल्याही क्षणी प्लास्टर कोसळेल, अशी भीती आहे.
दररोज बँकिंग, टपाल, विमा, मनीऑर्डरसाठी येणाऱ्या हजारो ग्राहकांना आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. त्यामुळे या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीकडून उपशहर संघटिका प्राची मनवे यांनी केला.
नेरळ पोस्ट ऑफिस कार्यालयाबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतीही दुरुस्तीची ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. इंटरनेट सेवादेखील गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने खातेदारांना सतत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
इमारतीला चारही बाजूंनी तडे गेले आहेत. सर्वत्र पाणी गळत आहे. नागरिक व कर्मचारी यांचा जीव धोक्यात आहे आणि प्रशासन हातावर हात धरून मूग गिळून गप्प बसले आहेत. जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना सातत्याने डोळ्यासमोर असताना न जाणो एका दिवसात ही इमारत कोसळली, तर जबाबदार कोण? येथे विद्युत वायर शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर वेळीच दुरुस्ती झाली नाही, तर शिवसेना महिला आघाडी थेट पोस्ट ऑफिसवर मोर्चा काढावा लागेल, असा ईशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन
येथील कर्मचारी वरिष्ठांच्या दबावामुळे बोलण्यास तयार नाहीत. लोक प्रतिनिधींचे देखील याकडे लक्ष नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये रोष वाढत आहे. प्रशासनाने तातडीने इमारतीची दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था केली नाही, तर शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनाचा प्रशासनाला सामना करावा लागणार आहे.
नेरळ येथील पोस्ट ऑफिसमध्ये नेहमीच इंटरनेट सेवा सुरलीत नसल्यामुळे गरीब खातेदारांना दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. इमारतीची तर अत्यत दयनीय अवस्था आहे. कधीही इमारतीचा भाग कोसळू शकतो अशी अवस्था झाली आहे. परंतू प्रशासन मात्र ढिम्म आहे. प्रशासनाने तात्काळ दुरूती करावी. दुरूती झाली नाही तर लवकर थेट पोस्ट ऑफिसवर मोर्चा काढू.
– प्राची मनवे, महिला उपशहर संघटिका, शिवसेना (ठाकरे गट)







