घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरु
। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असलेल्या आणि मध्य रेल्वेने जोडलेल्या नेरळ या ग्रामपंचायत मधील कचर्याचा प्रश्न गेली काही वर्षे सतत चर्चेला जात होता. हा प्रश्न रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरणकडून तब्बल तीन कोटींचा निधी मंजूर झाला असून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी दिला आहे. दरम्यान, नेरळकरांची कचर्यापासून लवकरच सुटका होणार असून महिनाभरात कार्यान्वित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेने नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील कचर्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीन कोटी रुपये खर्चाचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम नेरळ विकास प्राधिकरण मधून पूर्व भागातील कचरा डेपो येथे सुरु करण्यात आले आहे. नेरळच्या पूर्व भागात नेरळ ग्रामपंचायतीची पाच एकर जमीन असून त्या जमिनीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प साकारला जात आहे. या प्रकल्पामध्ये नेरळ गावाच्या कचर्यावर तात्काळ प्रक्रिया होणार असून कचरा डेपोत दररोज येणारा कचरा यावर त्याच दिवशी विघटन करून प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे हा कचरा डेपो भविष्यात शून्य कचरा डेपो करण्याचा निर्धार जिल्हा परिषद आणि नेरळ ग्रामपंचायतने केला आहे. त्यानुसार आगामी काळात या प्रकल्प साकारत असताना नेरळ ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी घरातून दिला जाणारा कचरा याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीमध्ये टाकावा लागणार आहे. ओला आणि सुका तसेच काचेच्या वस्तू यांचा कचरा यांचे वर्गीकरण करून कचरा दिला गेल्यावरच कचरा डेपो मध्ये त्या कचर्यावर प्रक्रिया करून त्याचे विघटन करता येणार आहे.त्यामुळे नेरळच्या ग्रामस्थांना आधी कचर्याचे वर्गीकरण कसे करायचे हे शिकून घ्यावे लागणार आहे.
नेरळ ग्रामपंचायतचा घनकचरा प्रकल्प यशस्वी करण्याचे देखील नेरळकरांचे हाती असल्याने नेरळ ग्रामपंचायतचा कचरा डेपो कधी शून्य कचरा डेपो होणार? याकडे लक्ष लागून राहणार आहे. मात्र राज्यातील निवडक ग्रामपंचायत वगळता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अन्य कुठेही नाही आणि त्यामुळे तीन कोटींचा खर्च होत असलेल्या नेरळ घनकचरा प्रकल्पाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कचरामुक्त करण्यासाठी आवाहन
नेरळ गावातील कचर्याचा प्रश्न नागरीकरणाकडे झुकलेल्या गावातील लोकांच्या हातात आहे. हा प्रश्न सोडविण्याचे आणि नेरळ गावाला कचरामुक्त गाव करण्याचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन या निमित्ताने नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच पारधी यांनी केले आहे.