नव्या युत्या 

मुंबईसह महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या येत्या जूनच्या आत होतील असा अंदाज आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्षांची नवी जुळवाजुळव सुरू झाली आहे. ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती. प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर या पूर्वसूरींच्या मैत्रीचा वास्ता त्यासाठी दिला जात होता. प्रकाश आंबेडकर गेली अनेक वर्षे दलित, ओबीसी, मराठा, मुस्लिम अशा बहुजनांची आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी त्यांनी आजवर विविध पक्षासोबत समझोता करून पाहिला आहे. मध्यंतरी ते एमआयएमसोबतही गेले होते. मात्र अकोला जिल्हा परिषद आणि पालिका यांच्यापलिकडे त्यांना विशेष यश मिळालेले नाही. गेल्या काही निवडणुकांमध्ये वंचित आघाडीच्या उमेदवारांनी मते खाल्ल्यामुळे आपले काही उमेदवार पडल्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा अनुभव होता. मायावतींच्या बसपइतक्या नव्हे, तरी काही प्रमाणात वंचितकडे एकगठ्ठा मते आहेत हे दिसून आले आहे. मुंबईत चेंबूर, गोवंडी यासारख्या भागात वंचितचा प्रभाव आहे. शिवाय, आंबेडकरांना पाठिंबा देणारा मतदार मुंबईभर पसरलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर अशी एकगठ्ठा मते मिळवून देणारे पक्ष सेनेला हवेच आहेत. त्यातही ठाकरे यांच्या दृष्टीने बोनस म्हणजे, शिवसेना देईल तितक्या जागा आम्हाला मंजूर असतील असे जाहीर करून प्रकाश आंबेडकरांनी जागावाटपातील संभाव्य धुसफूस संपवून टाकली आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे स्थान नगण्य आहे. मात्र काँग्रेसने अनेक वर्षे येथील सत्ता उपभोगलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचा म्हणून विशिष्ट मतदार आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी या निवडणुका एकत्रित लढणार किंवा कसे हे अद्याप स्पष्ट नाही. किंबहुना, शिंदे यांच्या बंडानंतर आघाडीचे अस्तित्व संपुष्टात आल्यात जमा आहे. तिच्या एकत्रित बैठका होत नाहीत. भाजप-शिंदे यांचा प्रतिवाद करण्यासाठी एकत्र डावपेच आखले जात नाहीत. परवा विधानसभा अध्यक्षांविरुध्द अविश्‍वास ठराव मांडण्यावरून यांच्यातील बेकी दिसून आलीच. त्यामुळे शिंदे यांच्याविरुध्दची लढाई शिवसेना एकटीच लढते आहे. आघाडीत हीच फाटाफूट कायम राहिल्यास सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे. त्यातही मुंबईत सेनेचा प्राण गुंतलेला आहे. तिथे अपयश आल्यास तिला आणखी घरघर लागेल यात शंका नाही. त्यामुळे तिने आंबेडकरांसोबत मैत्र जुळवले आहे. अर्थात या मैत्रीची किंमत वंचित आघाडी मराठवाडा व विदर्भात विधानसभेच्या वेळी वसूल करील यात शंका नाही. शिवसेनेने ही युती केल्यानंतर जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा हात पकडला आहे. कवाडे यांनी 1999 मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने चिमूरची लोकसभा जिंकली होती. अलिकडे ते काँग्रेसच्याच पाठिंब्याने विधानपरिषदेत गेले होते. आता शिंदे यांच्याशी समझोता करून असेच एखादे पद ते पदरात पाडून घेतील. मात्र या युतीचा त्यांच्या वा शिंदे यांच्या पक्षाला कितपत फायदा होईल हा संशोधनाचा विषय ठरेल. कारण, विदर्भातील काही भाग वगळता कवाडे यांचा प्रभाव कोठेही शिल्लक नाही.

Exit mobile version