हँडबॉल असोसिएशनची नवी कार्यकारिणी

| नाशिक | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील हँडबॉल खेळाच्या विकासाला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील हँडबॉल खेळाला सक्षम, दूरदृष्टीपूर्ण व प्रभावी नेतृत्व लाभल्याची भावना क्रीडा विश्वातून व्यक्त होत आहे. हँडबॉल स्पोर्ट्स असोसिएशन रायगड यांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल सावे यांच्यासह अन्य नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

ही निवडणूक हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली नाशिक येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे पार पडली. या निवडणुकीत निवृत्त न्यायमूर्ती भगवंतराव गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रीतपाल सिंग सलुजा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदाची जबाबदारी अतुल सावे यांच्याकडे देण्यात आली असून, विजय सोनवणे (जळगाव) यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्ष म्हणून हनुमंत लुंगे (अमरावती), उदय पवार (धुळे), जर्नाधन गुपिले (नांदेड) व रविदास शिरोडकर (सिंधुदुर्ग) यांची निवड करण्यात आली. महासचिवपदी रणधीर सिंग (मुंबई), कोषाध्यक्षपदी शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश धोंडगे (नाशिक) तर सहसचिव म्हणून पंकज भारसाखळे (छ. संभाजीनगर), आनंद चव्हाण (सोलापूर), मिलिंद शिंदे (ठाणे) व अभिजित वनिरे (कोल्हापूर) यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली आहे. या निवडीमुळे महाराष्ट्रातील हँडबॉल खेळाला नवे बळ मिळणार असून, राज्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी ही कार्यकारिणी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version