अनेक गावांतून निघाल्या क्रांतिज्योती
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका क्रांती दिन शासकीय पातळीवर साजरा करण्यात आला. यावर्षी प्रथमच क्रांतिदिनी विविध शाळांमधून क्रांतिज्योती काढण्यात आल्या. कर्जत शिक्षण विभागाने प्रथमच पुढाकार घेत क्रांतिज्योत माणिवली येथील हुतात्मा स्मारकात नेण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. यावेळी तब्बल सात शाळांनी आपल्या क्रांतिज्योती दौड काढून नेली.
कर्जत तालुका शिक्षण विभागाने आपल्या शिक्षण विभागातून क्रांतीज्योत नेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शनिवारी (दि.9) सकाळी विविध गावांतील क्रांतीज्योत माणिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारकाकडे निघाल्या. शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे यांच्या नियोजनातून शिक्षण विभागाने एक क्रांतीज्योत पहाटे 6 वाजता नेरळ येथील माथेरान नाक्यावर असलेल्या हुतात्मा चौकातून काढली. यावेळी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी सोनवणे, शिक्षक म्हात्रे यांच्यासह असंख्य शिक्षक त्यावेळी उपस्थित होते. ही क्रांतीज्योत माथेरान-कळंब राज्यमार्गाने आगरी समाज हॉल येथील हुतात्मा हिराजी पाटील मूर्ती येथे पोहचली. त्यानंतर धामोते, दहिवली, कोदीवले, बिरदोले अशी गावे करत अवसरे येथे पोहचली. त्यानंतर साडेनऊ वाजता क्रांती ज्योत माणिवली येथील हुतात्मा स्मारक येथे पोहचली. या ज्योतीचे सारथ्य नेरळ येथील एलएईएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील केले.
