| ठाणे | प्रतिनिधी |
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बुधवार, दि.29 एप्रिलपासून या पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे या महामार्गावर अरुंद खाडीपुलाच्या दोन्ही दिशेकडील मार्गिकेवर होणारी वाहतूक कोंडी फुटली असून ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई-नाशिक मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला होता. औद्योगिक वसाहती, वाढती नागरी वस्ती तसेच समृद्धी महामार्गशी झालेली जोडणी यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी खारेगाव खाडी परिसर, साकेत पूल आणि टोलनाका भागात दररोज वाहतूककोंडी होत होती. मात्र नवा खाडीपूल सुरु झाल्याने मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा, भिवंडी, कल्याण नाशिकच्या दिशेने व समृद्धी महामार्गाने मुंबई, ठाणे शहराकडे येणाऱ्या वाहनांना कोंडीतून दिलासा मिळणार आहे.
खारेगाव खाडीपूल वाहतुकीसाठी खुला
