प्रवाशांचा जादा वेळ-पैसा खर्च, सध्या महाडमार्गे वाहतूक
| महाड । वार्ताहर ।
दीड-दोन वर्षांपासून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सावित्री नदीवरील (बाणकोट खाडी) आंबेत पूल दुरुस्तीसाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सध्या वाहतूक महाडमार्गे होत असल्याने महाड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पर्यटकांबरोबरच खासगी प्रवासी कंपन्यांची वाहने शहरातून जात असल्याने महाडकरांना दररोज नाहक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. दापोली व मंडणगड तालुक्यातून प्रवास करणार्या प्रवाशांना देखील जादा वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे.
बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्या आंबेत गावात 1980 च्या दरम्यान पूल बांधण्यात आला. 376 मीटर लांबीच्या पुलामुळे दापोली, मंडणगड व खेड तालुक्याला मुंबईचा प्रवास सुखकर आणि जवळचा झाला. सावित्री पुलाची दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार कमकुवत व धोकादायक पुलांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश सरकारने दिले. त्यात आंबेत पुलाचाही समावेश होता.
डिसेंबर 2019 पासून या पुलाची दुरुस्ती सुरू होती. त्यानंतर जून 2021 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु पुन्हा पुलाला धोका निर्माण झाल्याने 24 मार्च 2022 पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तेव्हापासून अद्यापही पुलावरील वाहतूक बंदच आहे.
महाडमध्ये वाहतूक कोंडी
आंबेत पूल बंद झाल्याने या मार्गे ये-जा करणारी सर्व वाहतूक महाड शहरातून होत आहे. यामुळे चांदे क्रीडांगण येथील शाळांजवळ मोठी वाहतूक कोंडी होते. याशिवाय छत्रपती शिवाजी चौक, भगवानदास बेकरी, भोईघाट, महाड बाजारपेठ या ठिकाणी कोंडी होते. चांदे क्रीडांगणाजवळ चार शाळा असून या विद्यार्थ्यांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अपघाताची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे. महाडमधून प्रवास करणार्यांना निश्चित मार्ग माहिती नसल्याने गुगलचा आधार घेऊन अनेक प्रवासी चुकीच्या मार्गाने प्रवास करतात. महाडमध्ये एक दिशा मार्ग असल्याने मुंबई व दापोलीमार्गे जाणारे प्रवासी एकेरी मार्गावर प्रवास करतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते.