माणगाव | वार्ताहर |
वनवासी कल्याण आश्रम संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा उतेखोल या ठिकाणी नवीन स्वयंपाकगृह हस्तांतरण सोहळा शुक्रवार, दि. 17 जुलै रोजी पार पाडला. या आश्रमशाळेमध्ये सुमारे साडेचारशे आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.
दरम्यान, शालेय समिती अध्यक्ष महादेव जाधव यांच्या हस्ते स्वयंपाकगृह हस्तांतरण सोहळा पार पडला. याप्रसंगी वनवासी कल्याण आश्रमाचे संकुल समिती सहसचिव नितीन चांदोरकर, शालेय समिती सदस्य लक्ष्मण जंगम, वनवासी कल्याण आश्रम जिल्हा सचिव रवींद्र बोरसे, इयत्ता दहावीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांचे पालक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
1998-99 या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळेची सुरुवात भाड्याच्या दोन खोल्यांमध्ये झाली होती. सुसज्ज संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह, पहिली ते दहावीच्या स्वतंत्र वर्गखोल्या, सांस्कृतिक हॉल, सभा हॉल, कोठी गृह, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, अशा प्रकारच्या सुविधांनी परिपूर्ण अशी आश्रमशाळा वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र या संस्थेच्या माध्यमातून माणगाव तालुक्यात उतेखोल याठिकाणी चालविली जात आहे. दात्यांच्या माध्यमातून व संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या श्रमातून ही शाळा उभारण्यात आलेली आहे. शाळेच्या सुरुवातीला जे स्वयंपाकगृह बांधलेले होते, ते छोटे होते म्हणून मोठे व वायुवीजनयुक्त असे स्वयंपाकगृह असावे, असा विचार संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आला. सुसज्ज स्वयंपाकगृह बांधण्यासाठी 63 मूंस टेक्नॉलॉजी लिमिटेड मुंबई या कंपनीने मदतीचा हात दिला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ गाणेकर यांनी, तर आभार प्रदर्शन अरुण पाटील प्राथमिक मुख्याध्यापक आश्रम शाळा उत्तेखोल यांनी केले.