। माथेरान । वार्ताहर ।
थंड वार्याचा शहरा, लाल मातीचा रांगडा सुगंध, हिरवा शालू पांघरलेली डोंगररांग, गर्द वनराई, घोड्यांच्या टापांचा आवाज, या वर्णनावरून साहजिकच आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिल असेल ते म्हणजे महाराष्ट्रातील थंड हवेचे सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे माथेरान,जवळपास तीन हजार फुटांवर समुद्रसपाटीपासून 803 मीटर उंचीवरील एक नयनरम्य ठिकाण म्हणजे अर्थातच आपले माथेरान 21 मे म्हणजे माथेरानचा वाढदिवस 172 वर्षानंतर नव्या माथेरानची नवी उमेद घेऊन पर्यटकांचे केंद्र बिंदू ठरणार.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणजे आपले माथेरान 21 मे 1850 मध्ये ह्या सुंदर अश्या पर्यटनस्थळाचा शोध एका ब्रिटिश अधिकार्याने लावला त्यांचे नाव एच.पी.मॅलेट.हे एच.पी.मॅलेट त्या वेळचे ठाणे जिल्ह्याचे कलेक्टर होते.त्यावेळेस मॅलेट हे चौक गावाहून पायवाटेने वन ट्री हिल पॉईंट येथून माथेरानला आले आणि जातेवेळी ते रामबाग पॉईंट येथून पायवाटेने खाली उतरून पुन्हा चौक गावाकडे गेले.या दोन्ही पायवाटा अजूनही अस्तित्वात आहेत.असा हा एक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या ठिकाणी ब्रिटिश काळीन हॅरिटेज वास्तू आजही ऐटीत उभ्या आहेत.यामध्ये प्रामुख्याने येथील ब्रिटिशकाळीन बंगले, हॅरिटेज कपाडिया मार्केट,1897 सालचे करसनदास मूळजी ग्रंथालय या वास्तू आजही आपली छाप सोडत आहेत.याच बरोबर येथील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील छोटी झुक झुक गाडी म्हणजेच येथील मिनिट्रेन. डोंगर दर्याच्या नागमोडी वळणाची खडतर आव्हाने पेलून मोठ्या दिमाखात माथेरान मध्ये असंख्य पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी झटत असते. त्यावेळेस सन 1907 साली सर आदमजी पिरभाई आणि अब्दुल हुसेन आदमजी पिरभाई या पितापुत्रांच्या अथक परिश्रमातून आणि स्वखर्चाने रेल्वे प्रशासनाला लोकार्पण केलेली आहे. याच गाडीतून निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक हजेरी लावतात
इथले नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी निदान दोन दिवसांच्या मुक्कामी राहणे आवश्यक आहे.आणि त्याच बरोबर येथे एकदिवसीय पर्यटकांची तर बाराही महिने गर्दी असते. इतर पर्यटनस्थळांच्या तुलनेत माथेरान अगदी स्वस्त असून मुंबई-पुण्या पासून दोन तासांच्या अंतरावर आहे.त्यामुळे सगळेच मुंबईकर आणि पुणेकर पर्यटनासाठी माथेरानला अधिकाधिक पसंती देत आहेत.आत्ता तर उन्हाळी पर्यटन हंगाम देखील जोरात सुरू आहे. वर्षाच्या शेवटी इथे पर्यटकांची मंदियाळी असते, शनिवार आणि रविवारी म्हणजेच विकेंड मध्ये इथे पर्यटकांची संख्या जास्त असते.आणि एकदा आपले माथेरान पाहिल्यावर पुन्हा पुन्हा इकडे येण्यासाठी आपसूकच पाऊले वळतात यात शंका नाही.







