| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल शहरातील रस्ते खड्ड्यात गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ऐन गणेशोत्सवात देखील नागरिकांना या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नवीन पनवेल शहरातील रस्ते बनवून सहा महिनेदेखील उलटून गेले नाहीत, तेच या रस्त्यांवर मोठ मोठ्या प्रमाणात खड्डे पडण्यास सुरुवात झाली. गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात मातीच्या सहाय्याने येथील खड्डे भरण्याचा पराक्रम सुरू होता. त्यामुळे पुन्हा त्या खड्ड्यांवर खड्डे पडले. सेक्टर 1, 2, 3, 4 परिसर तसेच नवीन पनवेल द्वारका स्वीट समोरदेखील मोठा खड्डा पडलेला आहे. नवीन पनवेल ते पनवेलला जोडणाऱ्या ब्रिजवरदेखील खड्डे पडल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गणेशोत्सव काळातदेखील नागरिकांना तसेच गणेशभक्तांना याच खड्डे पडलेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. पनवेल महानगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







