| सुधागड -पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील मॅकमोहन हुले या प्रस्तरारोहकाने आपल्या सहकार्यांसह सरसगड किल्ल्यावर नवीन प्रस्तरारोहण मार्ग तयार केला असून, नववर्षात साहसी प्रस्तरारोहकांना येथून चढाई करता येणार आहे. प्रस्तररोकांना हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. नवीन साहसी प्रस्तरारोहकांना सरावासाठी सुद्धा हा मार्ग उपयोगी पडेल. त्यामुळे प्रस्तरारोहक सुखावले आहेत.

सरसगडावर पहिला मार्ग 1991 साली तयार केला आहे. आणि 2019 ला याच मार्गावर नवीन बोल्टिंग करण्यात आली आहे. मागील वर्षी हुले यांनी येथे बाजूला नवीन प्रस्तरारोहण मार्ग तयार केला आहे. याला स्पोर्ट्स क्लायंबिंग रूट असे म्हणतात. त्याच्या बाजूला हा दुसरा नवा पारंपारिक मार्ग तयार करण्यात आला आहे. दुसरा नवीन मार्ग तयार करण्याच्या या प्रस्तरारोहण मोहिमेत प्रस्तरारोहक मॅकमोहन तसेच सागर मिस्त्री (उत्तम बीलेर) व विशाल सांघवी सहभागी होते.
नवीन मार्ग व थरारक चढाई
हुले यांनी सरसगडाच्या उजव्या बाजूला 25 डिसेंबर रोजी नवीन पारंपरिक मार्गाने प्रस्तरारोहणाला सुरुवात केली. पारंपरिक प्रस्तारारोहण मार्ग म्हणजे या मार्गामध्ये तात्पुरत्या गिअर्सचा वापर होतो (पिटॉन्स, चॉक्स, हॅक्साफ, फ्रेंड्स). किल्ल्यावरील उजव्या बाजूची पाण्याची टाकी लगत असलेली भेग (अॅरेक्ट फॉर्मेशन) मध्ये 2 चॉक नट्सचा सुरक्षतेसाठी वापर करून या मार्गावरून साधारण 20 फूट चढता येते. येथे पहिल्या रिंग बोल्टवर सुरक्षा घेऊन 40 फूटावर सुरक्षित पहिले स्टेशन तयार केले असून पुढील मार्ग ट्रॅव्हर्स असल्याने वरच्या बाजूस पिटॉन मारून साधारण पंधरा फूट जाता येते. याच्या पुढील शंभर फुटाचा मार्ग या आठवड्यामध्ये पूर्ण करण्यात येईल.
सरसगडावरील या नवीन मार्गवर जिल्ह्यातील अनेक तरुण व मुले गिर्यारोहण व प्रस्तरारोहण करू शकतील. प्रस्तरारोहणाला अधिक उभारी देण्यासाठी दाते व संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
मॅकमोहन हुले
प्रस्तरारोहक व मॅक विला द जंगल यार्ड चे संस्थापक