रायगड हॉस्पिटलमध्ये नवीन सर्जिकल वॉर्ड

| नेरळ । प्रतिनिधी ।

ट्रॉमा केअर सेंटर म्हणून कर्जत तालुक्यात कार्य करणार्‍या रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये बनविण्यात आलेल्या सर्जीकल वॉर्डचे लोकार्पण करण्यात आले. त्याचवेळी नव्याने सुशोभिकरण करण्यात आलेल्या ओपीडी कक्षाचे लोकार्पणदेखील या कार्यक्रमात करण्यात आले.

कर्जत-कल्याण रस्त्यावर डिकसळ येथे असलेल्या रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील नव्याने बांधण्यात आलेल्या 100 बेडचे सार्जिकल मेडिकल वार्डचे लोकार्पण आणि ओपीडी कक्षाचे उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी प्रसाद थोरवे आणि शिवसेनेचे कर्जत संपर्क प्रमुख पंकज पाटील हे उपस्थित होते. 100 बेडची व्यवस्था असलेल्या आणि सर्व आधुनिक सुविधा यांनी युक्त असलेल्या सर्जिकल मेडिकल वॉर्डचे लोकार्पण प्रसंगी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच सरस्वती एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार तासगावकर, संस्थेच्या मानद सचिव वंदना तासगावकर यांच्यासह मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. विनायक सबनीस,रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुशाग्र पटेल हे प्रमुख उपस्थित होते.

नव्याने निर्माण झालेल्या वॉर्डमध्ये नाक कान घसा यांचा स्वतंत्र वॉर्ड तसेच नेत्र चिकित्सक आणि प्रयोगशाळा यांचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे आता रायगड हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली सिटी स्कॅनपासून एमआरआय स्केनिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

याप्रसंगी संस्थेचे प्रमुख डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी आपल्या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची मोठी टीम तयार असून दररोज असंख्य लहान मोठ्या शस्त्रक्रिया सुरू असतात. आता लेझर दुर्बिणीद्वारे हाडांची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

Exit mobile version