| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील लव्हाळवाडी येथील रहिवाशी असलेले दाम्पत्य नेरळ कर्जत राज्यमार्ग रस्त्यावरून प्रवास करीत असताना त्यांच्या मारूती वॅगनार कारला अपघात झाला. या अपघातात विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. तर, पती जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रायगड हॉस्पिटल अँड महाविद्यालय येथे उपचार घेत आहेत.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील लव्हाळवाडी येथे राहाणार प्रमोद कांदळगावकर हे पत्नी अर्पिता प्रमोद कांदळगावकर हे दोघे भालिवडी येथे घरगुती कामासाठी निघाले होते. कल्याण-कर्जत रस्त्याने प्रवास करीत असताना त्यांची (एमएच-04-जीएम-1436) ही मारुती वॅगनार नेरळ येथून जात असताना माणगाव फाटा येथे त्यांची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडकली. त्यामध्ये अर्पिता प्रमोद कांदळगावकर यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि त्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडी चालवत असलेले प्रमोद कांदळगावकर हे देखील जखमी झाले असून त्यांना तात्काळ रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
कांदळगावकर यांची कार ही रस्त्याने माफक गतीमध्ये कर्जतकडे जात होती. मात्र माणगाव समोर असलेल्या गोदामामधून एक टेम्पो अचानक मुख्य रस्त्यावर आला आणि त्यामुळे प्रमोद यांनी आपली कार बाजूला घेतली. त्यामुळे त्यांची कार ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जाऊन धडकली आणि त्यानंतर कारने तब्बल चार पलटी घेतली. त्यामुळे अर्पिता कांदळगावकर यांचा नाहक बळी गेला आहे. त्यामुळे गोदाम मधून बाहेर आलेल्या टेम्पो सदर अपघातास कारणीभूत असल्याने त्या टेम्पो चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुढे येत आहे.