। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
न्यूझीलंडचा महिला संघ अहमदाबाद येथे दुसरा वनडे सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या महिला संघांचा दुसरा वन डे सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
आजच्या लढतीपूर्वी न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अॅमेलिया केर हिला क्वाड्रिसेपच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या उर्वरित वनडे सामन्यांना मुकणार आहे. अहमदाबादमधील पहिल्या सामन्यात केरच्या डाव्या क्वाड्रिसिप स्नायूला दुखापत झाली होती. पहिल्या वन डेत तिने चार विकेट्स घेतल्या आणि 25 धावा केल्या होत्या. पण, भारताने हा सामना 59 धावांनी जिंकला होता. सामन्याच्या दुसर्या दिवशी केरला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले, ज्यामध्ये क्वाड्रिसेप फाटल्याची पुष्टी झाली आणि त्यामुळे तिला बरे होण्यासाठी अंदाजे तीन आठवडे लागतील. मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर यांनी सांगितले की, आम्ही मेलीसाठी खरोखर निराश झालो आहोत. दुखापत होणे ही खेळाडूसाठी नेहमीच आव्हानात्मक वेळ असते आणि आम्हाला माहित आहे की ती हे सामना खेळू न शकल्याने किती निराश आहे.