बांगलादेशकडून न्यूझीलंडचा पराभव

घरच्या मैदानात अवघ्या 98 धावांत गुंडाळलं

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बांगलादेश क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा त्यांच्याच भूमीवर 9 गडी राखून पराभव करत इतिहास रचला. या दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा 9 गडी राखून धुव्वा उडवला. क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने न्यूझीलंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यात पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 16 व्या षटकात सामना जिंकला.

मॅक्लीन पार्क, नेपियर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडचा संघ बांगलादेशी गोलंदाजांनी 31.4 षटकांत 98 धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून सलामीवीर विल यंगने 26 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.

यंग व्यतिरिक्त इतर तीन फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला. बांगलादेशी गोलंदाजांसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करली. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तनझिम हसन शाकिब आणि सौम्या सरकार यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. यांच्याव्यतिरिक्त मुस्तफिझूरने एक बळी मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान न्यूझीलंडने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली होती, त्यानंतर तिसरा सामना गमावला. परंतु, दोन सामने जिंकल्याने मालिका खिशात टाकली.

Exit mobile version