। अमेरिका । वृत्तसंस्था।
न्यूझीलंडच्या संघासाठी ट्वेंटी-20 विश्वचषक 2024 म्हणजे एक वाईट स्वप्नच. केन विल्यमसनच्या नेतृत्वातील संघाला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. गुरुवारी वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा पराभव करून सुपर-8 मध्ये प्रवेश केला.
अशातच एका पाकिस्तानी पत्रकाराने न्यूझीलंड संघाची खिल्ली उडवली आणि त्यांच्या देशाप्रती असलेल्या खेळाडूंच्या निष्ठेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू मिचेल मॅकक्लेनघनने या पत्रकाराला फटकारले आहे.पाकिस्तानच्या पत्रकाराने केन विल्यमसन बाद झाल्याचा एक फोटो शेअर केला. यामध्ये त्याने लिहिले की, जेव्हा आपण राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा पैशाला अधिक महत्त्व देऊ लागतो तेव्हा हे घडते. (विल्यमसन 1 धाव करून बाद) पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून न्यूझीलंडला ट्वेंटी-20 विश्वचषकाची तयारी करण्याची सुवर्णसंधी होती, मात्र अनेक बडे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत राहिले. आता बघा ते वर्ल्ड कपमधून बाहेर होत आहेत. मिचेल मॅकक्लेनघनचा संतापपाकिस्तानी पत्रकाराने भलतीच बाब मांडल्यानंतर न्यूझीलंडचा माजी खेळाडू संतापला. त्याने पाकिस्तानची लायकी काढली. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू मिचेल मॅकक्लेनघनने पाकिस्तानी पत्रकाराच्या पोस्टवर व्यक्त होताना म्हटले की, हा तोच पाकिस्तान संघ आहे जो न्यूझीलंडच्या ‘सी’ संघाकडून पराभूत झाला होता. याशिवाय आयर्लंड आणि अमेरिकेकडूनही त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ क गटात आहेत. या गटातून सुपर-8 साठी पात्र ठरणारा वेस्ट इंडिज पहिला संघ ठरला. त्यांनी तीनपैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला. दुसरीकडे न्यूझीलंडने दोनपैकी दोन्ही सामने गमावले आहेत. अफगाणिस्तानने दोनपैकी दोन्ही सामने जिंकून चार गुणांसह सुपर-8 साठी दावा ठोकला आहे. खरे तर न्यूझीलंडने उर्वरीत दोन सामने जिंकल्यास आणि अफगाणिस्तानने उरलेले दोन्ही सामने गमावल्यास दोन्ही संघांचे 4-4 गुण राहतील. पण, नेटरनरेटच्या बाबतीत राशिद खानचा संघ वरचढ असल्याने ते सुपर-8 साठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक आहे. सध्या अफगाणिस्तानचा सामना सुरू असून, ते सहज विजय मिळवून सुपर-8 चे तिकीट कन्फर्म करतील असे अपेक्षित आहे.
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
ट्वेंटी-20 विश्वचषक 2024 मधील 29 व्या सामन्यात अफगाणिस्तान आणि पापुआ न्यू गिनी हे संघ भिडले. नवख्या संघाचा दारूण पराभव करून अफगाणिस्तानने विजयाची हॅटट्रिक लगावली. यासह अफगाणिस्तानने सुपर-8 मध्ये प्रवेश केला. राशिद खानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिस्पर्धी पापुआ न्यू गिनी संघाला अवघ्या 95 धावांत गुंडाळून अफगाणिस्तानने सुपर-8 च्या दिशेने कूच केली. त्यांना सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यासाठी अवघ्या 96 धावांची आवश्यकता होती, या आव्हानाचा सहज पाठलाग करताना अफगाणिस्तानने मोठा विजय साकारला.
ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे हा सामना पार पडला. पापुआ न्यू गिनीने दिलेल्या 96 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 15.1 षटकांत 3 बाद 101 धावा केल्या. यासह राशिदच्या संघाने 7 गडी आणि 29 चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नायबने सर्वाधिक नाबाद धावा केल्या. तत्पुर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिस्पर्धी पापुआ न्यू गिनी संघाला अवघ्या 95 धावांत गुंडाळले. पापुआ न्यू गिनी संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज किप्लिन डोरिगा वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
फिरकीपटूंनी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकीने सर्वाधिक (3) बळी घेतले, तर नवीन-उल-हक (2) आणि नूर अहमदने (1) बळी घेतला. पापुआ न्यू गिनीचे तब्बल चार फलंदाज धावबाद झाले. अखेर पापुआ न्यू गिनीचा संघ 19.5 षटकांत केवळ 95 धावांत गारद झाला. 96 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने सहज विजय मिळवला. अफगाणिस्तानने तीनपैकी सर्व तीन सामने जिंकून सहा गुणांसह सुपर-8 मध्ये प्रवेश केला. त्आता न्यूझीलंडने उर्वरीत दोन सामने जिंकले तरी त्यांना सुपर-8 ची फेरी गाठता येणार नाही.
