स्वतः उपांत्य फेरीत; पाकिस्तान जवळपास बाहेर
| मुंबई | वृत्तसंस्था|
न्यूझीलंडने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवत विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली. त्यामुळे कुंपणावर असलेल्या पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आल्यातच जमा आहे. सलग चार विजय आणि त्यानंतर सलग चार पराभव, त्यामुळे अडचणीत सापडलेल्या न्यूझीलंडला आज विजय आवश्यक तर होताच; पण पाकला शर्यतीत येऊ न देण्यासाठी मोठा विजय आवश्यक होता. या दोन्ही गोष्टी त्यांनी श्रीलंकेवर 5 विकेट आणि 160 चेंडू राखून साध्य केल्या. या सामन्यावर पावसाचे सावट होते; परंतु एकही सर आली नाही, मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 171 धावांत गुंडाळ्यानंतर धावांचा पाऊस पाडला. कॉनवे (45) आणि राचिन रवींद्र (42) यांनी सात धावांच्या सरासरीने 86 धावांची सलामी देऊन मोठा विजयाचा पाया रचला.
पाकविरुद्धच्या सामन्यात 400 धावा करूनही केवळ पावसामुळे आव्हान कमी झाल्याने सर्व गणित बिघडल्याच्या अनुभवावरून आज न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि दुसऱ्याच षटकात पहिले यश मिळवले. श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडीस आणि समरविक्रमा यांना बोल्टने एकाच षटकात बाद केले तेव्हा श्रीलंकेची अवस्था 3 बाद 32 अशी झाली होती. पहिल्याच षटकात शून्यावर जीवदान मिळालेल्या कुशल परेराच्या मनात मात्र काही वेगळेच होते.
तुफान टोलेबाजी करत त्याने या विश्वकरंडक स्पर्धेतले सर्वात वेगवान अर्धशतक केले. फलंदाजी किती बाद झाले, याची चिंता करण्यापेक्षा तो आक्रमण करत राहिला; मात्र संघाच्या 70 या धावसंख्येवर श्रीलंकेने त्याच्यासह चरिथ असलंका यांना गमावले आणि तेथेच त्यांच्या धावसंख्येला ब्रेक लागला. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज आणि धनंजय डिसिल्व्हापाठोपाठ माघारी फिरले. 7 बाद 105 अशा संकटात सापडलेल्या श्रीलंकेची पुढे 9 बाद 128 अशी दारुण अवस्था झाली. महिष तिक्शाना आणि दिलशान मधुशंका या अखेरच्या जोडीने हार मानली नव्हती. तब्बल 87 चेंडू किल्ला लढवत त्यांनी 43 धावांची भागीदारी केली. त्यामुळे लंकेला 171 धावांपर्यंत मजल मारता आली.







