‌‘कृषीवल‌’चा वृत्त गौरव पुरस्काराने होणार सन्मान

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय दैनिक ‌‘कृषीवल‌’च्या नऊ दशकांच्या प्रभावी पत्रकारितेचा गौरव करत, कलाविश्व फाऊंडेशनतर्फे ‌‘वृत्त गौरव सन्मान‌’ प्रदान करण्यात येणार असून, हा सोहळा मंगळवारी अलिबागमध्ये पार पडणार आहे.

रायगड जिल्ह्यात जनसामान्यांचा आवाज ठरलेल्या आणि विश्वासार्हतेची ओळख निर्माण केलेल्या ‌‘कृषीवल‌’ या दैनिकाला निर्भीड पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी ‌‘वृत्त गौरव सन्मान‌’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नऊ दशकांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या दैनिकाने मराठी पत्रकारितेत एक वेगळा ठसा उमटवला आहे.

कलाविश्व फाऊंडेशनच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि कलात्मक कार्याला यंदा 12 वर्षे पूर्ण होत असून, या तपवर्षपूर्ती निमित्ताने हा विशेष पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, 14 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता अलिबाग येथील सँडी रिसॉर्ट (हॉटेल रविकिरणच्या मागे) येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

छापील माध्यमातून सुरू झालेला ‌‘कृषीवल‌’चा प्रवास आज डिजिटल युगातही तितक्याच प्रभावाने सुरू आहे. पारंपरिक पत्रकारितेची शिस्त आणि आधुनिक, वेगवान व वाचक-केंद्रित दृष्टिकोन यांचा सुंदर मेळ साधत ‌‘कृषीवल‌’ने स्वतःला काळानुसार सातत्याने अपडेट ठेवले आहे.
विश्वासार्हता, वेग आणि दर्जेदार लेखनशैली या बळावर ‌‘कृषीवल‌’ने वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. माहितीच्या प्रचंड गर्दीतही अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देत मराठी डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा देण्याचे कार्य ‌‘कृषीवल‌’ने यशस्वीपणे पार पाडले आहे.

Exit mobile version