विरार-अलिबाग कॉरिडॉरचे पुढचे पाऊल; नवघर ते चिरनेरचा पहिला टप्पा

| उरण | वार्ताहर |

मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरणार्‍या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या 80 किमीच्या मार्गासाठी वने आणि पर्यावरण मंत्रालयाची परवानगी अखेर रस्ते विकास मंडळाने मागितली आहे. ती मिळाल्यास या मार्गाच्या बांधणीतील मोठा अडसर दूर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा मार्ग नवघर नजीकच्या नागरपासून सुरू होणार आहे. चिरनेरपर्यंतच्या या मल्टिमॉडेल कॉरिडॉरसाठी पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खारफुटीस वनजमीन लागणार आहे. एमएसआरडीसीच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार, प्रकल्पात सुमारे 5,135 झाडे प्रभावित होणार आहेत. तुंगारेश्‍वरसह कर्नाळा, फणसाड ही अभयारण्यांना त्याचा फटका बसणार आहे.

रायगडातील 72 हेक्टर वनक्षेत्र बाधित
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला सादर केलेल्या प्रस्तावानुसार, पालघरमधून एकूण 33.278 हेक्टर वनक्षेत्र, ठाण्यातून 99.88 हेक्टर आणि रायगडमधून 72.654 हेक्टर वनक्षेत्र या प्रकल्पात बाधित होणार आहे. असा असेल कॉरिडोर 80 किमी लांबीच्या कॉरिडॉरचा प्रारंभ बिंदू वसईतील बापाणे गावात असून शेवटचा बिंदू उरणमधील चिरनेर आहे. हा कॉरिडॉर मुंबई-अहमदाबाद महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. यामध्ये आठ इंटरचेंज, 28 वाहन अंडरपास, 16 पादचारी अंडरपास आणि 120 कल्व्हर्ट असतील.

हा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्याचा मोठा लाभ होणार असून येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे. विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर एमएमआरडीएकडून एमएसआरडीसीकडे सोपविल्याने महामंडळास तो समृद्धी महामार्गासह प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस वे सह जेएनपीटीला जोडता येणे सोपे झाले आहे. सध्या समृद्धी महामार्गाची जेएनपीटीला जोडणी नसल्याने एमएसआरडीसीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई-वडोदरा महामार्गावर अवलंबून राहावे लागत आहे.

यात पहिला टप्पा हा विरारनजीकच्या नवघर ते उरणनजीकच्या बलवली आणि दुसर्‍या टप्प्यात बलावली ते अलिबाग असा विकसित करण्यात येणार असून तो समृद्धी आणि कोकण एक्स्प्रेस वे ला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याशिवाय मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, जेएनपीटी ते मुंबई-गोवा-पुणे ायांना जोडणारा एनच-4 बी या महामार्गांना तो जोडण्यात येणार आहे.

Exit mobile version