भिरा फाटा प्रदूषणाच्या विळख्यात

महामार्गावरील भंगाराच्या गोदामात रात्रीची जाळपोळ; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गालागत गेली अनेक वर्षे वरसगाव भिरा फाटा, कोलाड, पुई, पुगाव, खांबदरम्यान ठिये मांडून बसलेले अनेक भंगाराची गोदामे आहेत. या गोदामात काही विशिष्ट प्रकारच्या केमिकलमिश्रित रासायनिक भंगाराची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली जात असून, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, ज्या ग्रामपंचायत हद्दीत ही गोदामे आहेत, त्यांच्याकडून भंगार गोदामाला परवानगी आहे का, असादेखील सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कोलाड खांब मार्ग या परिसरातील एका भंगार गोदामाला अचानक आग लागली असता, या आगीने मोठे रौद्ररुप धारण केले होते. प्रसंगी रोहा, महाड, खोपोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या होत्या व त्यांच्या अथक प्रयत्नानंतर ती आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल चार ते पाच तासांहून अधिक वेळ लागला. हे उदाहरण समोर असूनदेखील पुन्हा गेली अनेक वर्षे या मार्गालगत गावाशेजारी हेच प्रकार या भंगार गोदामात घडत आहेत. त्यामुळे पुन्हा धोक्याचा प्रसंग उद्भवण्याची चिन्ह निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत.

तरी या गोष्टीचा संबंधित विभागाने याचा गांभीर्याने विचार करून भंगार गोदामात होत असलेली जाळपोळ प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी, नागरिक व पर्यावरणप्रेमी यांच्याकडून केली जात आहे आहे.

Exit mobile version