रॅली चॅम्पियनशिप जिंकणारी पहिलीच युवती
| पुणे | प्रतिनिधी |
आज सर्वच क्षेत्रात महिला आणि मुली या मागे नाहीत याचा प्रत्यय हा नेहमीच आपल्याला येत असतो. मलेशियामध्ये मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्या पुण्याच्या निकिता टकले खडसरे या युवतीने चॅम्पियनशिप रॅलीचे प्रथम पारितोषिक पटकावले. राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळविलेली निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर चॅम्पियनशिप मिळविणारी पहिली युवती ठरली. स्पर्धेच्या चार विभागात निकिताने ट्रॉफी मिळविली आहे.
एम.आय.आर.सी. रॅली ऑफ आशान, मलेशियामध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया, चायना देशातील सुमारे 22स्पर्धक सहभागी झाले होते. राज्यस्तरीय, राष्ट्रीय, पातळीवर स्पर्धेत अनेक वेळा भाग घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनेक अडचणींना निकिताला सामोरे जावे लागले. त्यात भाषा, तंत्रज्ञान, नियमावली या सर्व गोष्टींना तोंड द्यावे लागले. रॅली सुरू झाल्यावर पहिल्याच स्टेजमध्ये एक किलोमीटरला इलेक्ट्रिक समस्या झाली. कार दुरुस्त केली पुन्हा रॅलीत सहभागी होऊन पूर्ण केली. यामध्ये नऊ स्टेजमध्ये जास्त गुण मिळवून निकिताने सर्व समस्यांवर मात करत चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकाविली. सुमारे 365 रॅली त्यातील 86 आंतरराष्ट्रीय रॅलीत सहभाग असल्याने सहचालक मुसा शरीफ यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाला, असं निकिता सांगते.
मलेशिया चॅम्पियनशिप रॅली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अवघड रॅली मानली जाते. या रॅलीत सहभागी स्पर्धक जगातील कुठल्याही रॅलीत चांगल्या पद्धतीने सहभागी होऊ शकतात. त्यामुळे या रॅलीला अधिक महत्त्वआहे. पामच्या झाडांमधून कार चालविताना फार सावध भूमिका घेत सहचालक मुसा शरीफ यांच्या सहकार्याने निकिता टकलेने चॅम्पियनशिप रॅलीत भारताचा झेंडा फडकविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर चॅम्पियनशिप मिळविणारी निकिता पहिली स्पर्धक ठरली आहे. भविष्यात माझं स्वप्न आहे की जगात ज्या मोठ्या मोठ्या रॅली आहेत, त्यामध्ये सहभाग घ्यायचा आणि मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे. या सगळ्यात मला माझ्या कुटुंबाचीदेखील चांगली साथ मिळाली, अशा भावना निकिता हिने व्यक्त केल्या.