एकाच छताखाली कार्यालय नसल्याने नागरिक त्रस्त
| म्हसळा | प्रतिनिधी |
सुविधांचा अभाव असलेल्या आणि गैरसोयीने व्यापलेल्या म्हसळा तालुक्यात शासकीय जागा आणि इमारतीअभावी नागरिकांची फारच दमछाक होत आहे. म्हसळा शहरात जुने महाल म्हणुन नामांकीत असलेल्या मध्यवर्ती तहसिल कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असल्यामुळे नव्याने तहसीलदार कार्यालय एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दिघी रोडवरील पाच गाव आगरी समाजाच्या इमारतीत भाडे तत्वावर आधारित कार्यरत आहे. असे असले तरी या इमारतीत तलाठी आणि सेतु कार्यालय नाही. ही कार्यालये एकाच ठिकाणी गरजेची असताना तत्कालीन तहसीलदार यांनी तालठी कार्यालय बायपासला आणि सेतु कार्यालय हे शहरात ठेवले आहे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था सध्या म्हसळा तालुका शहर व ग्रामीण भागातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी व नागरिकांची झालेली आहे. जनतेला एकाच ठिकाणी लागलीच सेवा देणे सरकारचे धोरण असताना म्हसळा तालुका मात्र अशाप्रकारे सेवेपासून त्रस्त आणि अपवाद आहे.
म्हसळा तालुका तहसिल कार्यालय खासगी संस्थेला एका महिन्याचे अव्वाच्या सव्वा भाडे मोजत आहे. सेतुत काम असेल तर नवीन तहसिल कार्यालयात 1 किमी जावे लागते. तहसिल कार्यालयात काम झाले तर पुन्हा एक किमी सेतुत जावे लागते. असे एक ना अनेक हेलपाटे मारावे लागतात. त्यातच तलाठी कार्यालयात काम असेल तर बायपासजवळ कन्या शाळेशेजारील चाळीत जावे लागते. येथे तर आलेल्या नागरीकांना गोड शब्दाची अपेक्षा नाहीच पण बसण्या उठण्याची कसलीच सोय नाही.
झपाट्याने वाढत चाललेला आणि विकासाची गंगा वाहत असतानाही कुठे नेऊन ठेवला आहे म्हसळा माझा, अशीच आता बोलण्याची वेळ आली आहे. म्हसळा तहसिल कार्यालयाचे नव्या इमारतीच्या व्हरांड्यात भला मोठा सभा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात तहसिल कार्यालयाने खासगी व्यवसाय करणारे बाँड वेंडर यांना बसण्या-उठण्याची व्यवस्था केली आहे. मग तहसिल कार्यालयाशी निगडित असलेला तलाठी आणि सेतु कार्यालय याच जागेत उभारता आले असते. याबाबत नागरीकांना आश्चर्य वाटत आहे.
शासन आणि प्रशासन हा नागरिकांचा मुख्य दुवा आहे. त्यांनाच सेवा सुविधा देताना संबंधित अधिकाऱ्यांनी खेळ करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पडला आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी जनतेला होत असलेल्या गैरसोयीची दखल घेऊन वेळीच योग्य ती कार्यवाही करावी, अशी जाहीर मागणी म्हसळा तालुका नागरिकांनी केली आहे.